

मिरज : शहरातील वंटमुरे कॉर्नर येथे भटक्या कुत्र्याला वाचविण्याच्या प्रयत्नात मोटारीचा भीषण अपघात झाला. यामध्ये मोटारीतील एकाचा जागीच मृत्यू झाला, तर तिघे गंभीर जखमी झाले. विश्वजित दिलीप नाईक (वय 21, रा. 100 फुटी रोड, सांगली) असे मृताचे नाव आहे. अपघातात ओंकार सुनील पाटील, वैभव नंदकुमार पाटील आणि अनिकेत आशिष कुमामेकर हे गंभीर जखमी झाले. रविवारी पहाटे हा अपघात घडला. याप्रकरणी मृत विश्वजित नाईक याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विश्वजित नाईक याच्यासह चौघे रविवारी पहाटे मोटारीतून सांगलीतून मिरजेकडे निघाले होते. विश्वजित नाईक हा मोटार चालवत होता. पहाटेच्या सुमारास मिरजेतील वंटमुरे कॉर्नर येथे आल्यानंतर अचानकपणे त्यांच्या मोटारीसमोर भटके कुत्रे आले. कुत्र्याला वाचविण्याच्या प्रयत्नात विश्वजित याचा मोटारीवरील ताबा सुटला. त्यामुळे मोटार थेट रस्त्याकडे असलेल्या डिजिटल फलकावर व भिंतीवर जाऊन आदळली. अपघात इतका भीषण होता की, मोटारीचा अक्षरश: चेंदामेंदा झाला. यामध्ये विश्वजित याचा जागीच मृत्यू झाला, तर मोटारीतील इतर तिघे गंभीर जखमी झाले. याबाबत माहिती मिळाल्यानंतर सहायक निरीक्षक संदीप शिंदे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. याबाबत महात्मा गांधी चौक पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे.
अपघातावेळी मोटार वेगात होती. भरधाव मोटार डिजिटल फलकावर आणि भिंतीवर जाऊन आदळल्यानंतर स्फोटासारखा आवाज झाला. त्यामुळे इमारतीच्या सुरक्षिततेसाठी रस्त्याकडे झोपलेले सुरक्षा रक्षक खडबडून जागे झाले. या भीषण अपघाताची दृश्ये सीसीटीव्ही कॅमेर्यात कैद झाली आहेत.