

येडेनिपाणी : वाळवा तालुक्यातील येडेनिपाणी येथे दुचाकीस्वाराने धडक दिल्याने सकाळी व्यायामासाठी गेलेल्या सुमन कृष्णात पाटील (वय 55, रा. येडेनिपाणी) यांचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी सकाळी घडली. अपघाताची नोंद कुरळप पोलिस ठाण्यात झाली आहे.
याबाबत घटनास्थळ व पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, सुमन पाटील या पहाटे येडेनिपाणी फाटा या बाजूला फिरायला गेल्या होत्या. परत येत असताना जिल्हा परिषद शाळेपासून अर्धा किलोमीटर अंतरावर पाठीमागून आलेल्या दुचाकीस्वार अक्षय दिलीप पाटील (रा. येडेनिपाणी) याने त्यांना जोराची धडक दिली. त्यामुळे त्या रस्त्यावर पडल्या. या अपघातात त्या गंभीर जखमी झाल्या. इस्लामपूर येथील रुग्णालयात नेत असताना त्यांचा मृत्यू झाला. अक्षय पाटील हा कोल्हापूर येथून कामावरून घरी चालला असताना ही घटना घडली. घटनेची फिर्याद दीपक शामराव पाटील यांनी कुरळप पोलिसांत दिली आहे. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक विक्रम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोेलिस अमोल माळी करीत आहेत. मृत सुमन पाटील यांच्या पश्चात पती, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.