

इस्लामपूर: पैशाने पैसा कमावण्याचे स्वप्न दाखवून वाळवा तालुक्यात गेल्या वर्षभरात ऑनलाईन शेअर मार्केट, गुंतवणुकीच्या नावाखाली मोठा आर्थिक गंडा घालण्यात आल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. डॉक्टर, मोठे व्यावसायिक आणि अनेक प्रतिष्ठित नागरिकांना लक्ष्य करून हा कोट्यवधी रुपयांचा महाघोटाळा झाला आहे. वाळवा येथील एका डॉक्टरांची 14 लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला.
वाळवा तालुक्यातील इस्लामपूरसह अनेक गावांमध्ये काही गुंतवणूक सल्लागार आणि त्यांच्या टोळ्या सक्रिय झाल्या आहेत. त्यांच्याकडून शेअर बाजारात जादा परतावा देण्याचे आमिष दाखवले जात आहे. सुरुवातीला लहान रकमेवर चांगला परतावा देऊन गुंतवणूकदारांचा विश्वास संपादन केला जातो. याच विश्वासाच्या जाळ्यात डॉक्टर्स, मोठ्या दुकानांचे मालक आणि इतर व्यावसायिक अडकले आहेत. ज्यांनी जलद श्रीमंत होण्याच्या लालसेने मोठी रक्कम गुंतवली.
लाखो रुपयांचा घोटाळा : पैसे गोठले सांगून अधिक मागणी!
बनावट ॲप्स, व्हॉट्सॲप आणि आकर्षक योजनांच्या माध्यमातून लोकांना लाखोंची गुंतवणूक करण्यास प्रवृत्त करण्यात येत आहे. काही दिवसांनी तुमचे पैसे मोठ्या नफ्यासह गोठले आहेत किंवा ते काढण्यासाठी तुम्हाला आधी टॅक्स म्हणून मोठी रक्कम भरावी लागेल, असे खोटे कारण सांगून गुंतवणूकदारांवर पुन्हा पैसे भरण्यासाठी दबाव आणला जात आहे. काही महिन्यांपूर्वीच इस्लामपुरात अनेक जणांना कोटींचा गंडा घातल्याचे उघड झाले होते. आता या फसवणुकीची व्याप्ती कोट्यवधी रुपयांच्या घरात गेली आहे.
डॉक्टरांची 14 लाखांची फसवणूक !
फसवणुकीच्या या साखळीतील शिकार वाळवा येथील एक डॉक्टर ठरले. त्यांना जादा परताव्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडून 14 लाख रुपये उकळण्यात आले. गुंतवणूक करण्यापूर्वी कंपनीची किंवा व्यक्तीची पार्श्वभूमी तपासण्याची खबरदारीसुद्धा नागरिक घेत नाहीत.