

इस्लामपूर : वाळवा पंचायत समितीच्या 22 गणांची आरक्षण सोडत येथील राजारामबापू नाट्यगृहात पार पडली. प्रांताधिकारी श्रीनिवास अर्जुन यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार सचिन पाटील यांनी ही प्रक्रिया राबवली. विद्यार्थी श्रेयश कांबळे याच्याहस्ते चिठ्ठ्या काढून आरक्षण सोडत काढण्यात आली. आता, तालुक्यातील राजकीय घडामोडीना वेग येणार आहे.
सन 2011 च्या जनगणनेनुसार तालुक्याची लोकसंख्या 3 लाख 51 हजार 506 आहे. ग्रामविकास विभागाकडून वाळवा पंचायत समितीसाठी 22 सदस्यसंख्या निश्चित करण्यात आली असल्याचे यावेळी तहसीलदार सचिन पाटील यांनी सांगितले. सकाळी 11 वाजता नाट्यगृहात प्रांताधिकारी श्रीनिवास अर्जुन यांच्या उपस्थितीत सोडतीला सुरुवात झाली. लोकसंख्येनुसार पहिल्यांदा अनुसूचित जातीचे आरक्षण काढण्यात आले. त्यानंतर विद्यार्थ्याकडून चिठ्ठ्या उचलून आरक्षण सोडत काढण्यात आली. यावेळी निवासी नायब तहसीलदार प्रज्ञा कांबळे, निवडणूक नायब तहसीलदार दगडू उगले, अव्वल कारकुन कैलास कोळेकर, मंडळ अधिकारी विनायक यादव, लिपिक सुनील साळुंखे आदी उपस्थित होते.
पंचायत समितीचे आरक्षण असे, सर्वसाधारण - बोरगाव, नेर्ले, वाटेगाव, कामेरी, चिकुर्डे, कारंदवाडी, बागणी, येलूर. सर्वसाधारण महिला - गोटखिंडी, बहादूरवाडी, पडवळवाडी, कासेगाव, बावची, वाळवा, पेठ. नागरिकांचा मागास प्रवर्ग- ऐतवडे बुद्रुक, साखराळे. नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला- रेठरेधरण, रेठरेहरणाक्ष, कि.म.गड. अनुसूचित जाती- कुरळप. अनुसूचित जाती महिला - ताकारी.
नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी 22 पैकी 5 जागा राखीव असल्याचे तहसीलदार पाटील यांनी सांगताच काहींनी आक्षेप घेतला. लोकसंख्येनुसार 5.94 म्हणजे 6 जागा मिळाव्यात असे त्यांचे म्हणणे होते. मात्र, नियमानुसारच ही प्रक्रिया राबवली जाईल, हरकती असतील तर त्या विभागीय आयुक्तांकडे दाखल करा, असे प्रांताधिकारी श्रीनिवास अर्जुन यांनी सांगितल्यानंतर सोडत पुन्हा सुरू झाली.