दहिवडी : पुढारी वृत्तसेवा
माण-खटावचे आ. जयकुमार गोरे यांच्या ताफ्यातील वाहन चालकाने शनिवारी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास काळ्या रंगाच्या स्कार्पिओतून जाताना बिदालमधील शेरेवाडी वस्तीवरील बसस्टॉपनजीक दुचाकीवरून जाणार्या दोघांना उडवले. अपघातामध्ये चुलतभाऊ असलेल्या दोन युवकांचा मृत्यू झाला असून, स्कार्पिओ चालक साईनाथ रघुनाथ जाधव (रा. आगासवाडी, पो. कुकुडवाड) याला अटक करण्यात आली आहे. दरम्यान, हा अपघात इतका भीषण होता की, दोन्ही वाहनांचा चक्काचूर झाला.रणजित राजेंद्र मगर (वय 32), अनिकेत नितीन मगर (वय 24, दोघे रा. शेरेवाडी-बिदाल, ता. माण) असे अपघातात मृत्यू झालेल्या दोघांची नावे आहेत.मृत दोघेही चुलत भाऊ होते.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, आ. जयकुमार गोरे यांच्या ताफ्यातील एमएच 11 डीएन 100 या क्रमांकाची स्कॉर्पिओ कार घेऊन चालक साईनाथ जाधव गटेवाडीकडे कार्यक्रमासाठी निघाला होता. शेरेवाडी बसस्टॉपवर शेरेवाडी गावातून दुचाकीवरुन जाणार्या दोघांना मलवडीकडून आलेल्या स्कार्पिओची धडक बसली. स्कॉर्पिओ चालक जाधव हा भरधाव वेगात कार चालवत होता. त्याला रस्त्याचा अंदाज न आल्याने दुचाकीला जोराची धडक बसली. यामुळे सुमारे 40 ते 50 फूट दुचाकी फरपटत गेली. अपघाताचा जोरदार आवाज आल्याने परिसरातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली.
भीषण अपघात झाल्याचे पाहून ग्रामस्थही हादरुन गेले. अपघातात दोन युवक रक्तबंबाळ झाल्याचे पाहून तात्काळ खासगी वाहनाने जखमींना दहिवडी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र दोघांचाही मृत्यू झाला होता. अपघातग्रस्त वाहन आ. जयकुमार गोरे यांच्या ताफ्यातील कार्यकर्त्याचे असल्याचे समोर आल्यानंतर अनेकांनी बिदालकडे धाव घेतली. आ. जयकुमार गोरे यांना घडलेली घटना गोंदवलेकडे जात असताना समजली. त्यांनी तातडीने दौरा रद्द करून दहिवडी रुग्णालयात धाव घेतली. पोलिसांना घटनेचा पंचनामा करून जे सत्य आहे त्या पद्धतीनेच काम करण्यास सांगितले. अपघातात युवकांचा मृत्यू झाल्याचे समजताच आ. जयकुमार गोरे यांनी हळहळ व्यक्त केली. दरम्यान, अपघाताची तक्रार दिपक सदाशिव मगर (वय 45, रा. शेरेवाडी) यांनी दिली आहे.