

सांगली : शहरातील विश्रामबाग चौकातून बालकाच्या अपहरणप्रकरणी फरारी असणार्या दोघांना पोलिसांनी शिराळ्यातून अटक केली. इम्तियाज पठाण आणि वसीमा इम्तियाज पठाण अशी त्यांची नावे आहेत. यापूर्वी इनायत गोलंदाज याला अटक करण्यात आली होती. अटक करण्यात आलेल्या दोघांना सोमवारी न्यायालयात हजर केले. त्यांना पाच दिवस पोलिस कोठडी सुनावली आहे.
विश्रामबाग येथे फुगे विक्री आणि सिग्नलवर थांबलेल्या गाड्यांचा काचा पुसणार्या राजस्थानमधील दाम्पत्याचे बालक चोरले होते. त्यानंतर तिघांनी रत्नागिरी जिल्ह्यातील सावर्डे येथील मूल नसलेल्या एका दाम्पत्यास ते एक लाख 80 हजार रुपयांना विकले होते. याबाबत बागरी कुटुंबाने पोलिसात तक्रार दिल्यानंतर चार दिवसांत इनायत गोलंदाज याला मिरजेतून अटक करण्यात आली होती. त्याने पठाण दाम्पत्याच्या साहाय्याने बालक चोरून विकल्याची कबुली दिली होती. पोलिसांनी रत्नागिरी येथून सावर्डे गावातून अपहरण करून विकलेल्या बालकाची सुटका केली होती.
परंतु गेल्या 10 ते 12 दिवसांपासून फरार असणार्या पठाण दाम्पत्याच्या मागावर विश्रामबाग पोलिस होते. दोघे शिराळ्यात असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिस निरीक्षक सुधीर भालेराव यांनी उपनिरीक्षक प्रवीण कांचन, बिरोबा नरळे, स्नेहल मोरे, पूजा कोकाटे यांचे पथक पाठवून पठाण दाम्पत्यास अटक केली. त्यांना न्यायालयाने पाच दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे.
बागरी कुटुंबाचे बालक चोरून त्याची एक लाख 80 हजार रुपये किंमतीला विक्री केली होती. सावर्डे येथील कुटुंबाने ती रक्कमही दिल्याचे तपासात समोर आले आहे. परंतु ही रक्कम पठाण कुटुंबाकडे असण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीनेही विश्रामबाग पोलिस तपास करीत आहेत.