

सांगली : येथील सांगली आणि मिरज शासकीय रुग्णालयासाठी सुमारे तीन कोटींची औषधे उपलब्ध झाली आहेत. यामुळे किमान तीन ते चार महिन्यांचा औषधांचा प्रश्न मिटला आहे. औषधसाठा ठेवण्यासाठी गोदाम बांधण्याचे काम लवकरच सुरू होणार आहे. सध्या जागा नसल्यामुळे ही औषधे रुग्णालयातील वॉर्डमध्ये ठेवण्यात आली आहेत.
सांगलीचे पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालय आणि मिरजेचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांना वर्षाला सुमारे 30 ते 32 कोटींची औषधे लागतात. शासनाकडून या औषधांचा पुरवठा करण्यासाठी खासगी कंपनीला ठेका देण्यात आला आहे. अनेकवेळा पुरेसा आणि वेळेत औषधे मिळत नसल्यामुळे रुग्णांना बाहेरून औषधे आणावी लागतात. याबाबत वैद्यकीय प्रशासनाने वेळोवेळी पाठपुरावा केल्यानंतर पंधरवड्यापूर्वी दोन्ही रुग्णालयांना मिळून सुमारे तीन कोटींच्या औषधांचा पुरवठा करण्यात आला आहे.
सांगलीच्या शासकीय रुग्णालयात सांगली जिल्ह्याबरोबरच सोलापूर आणि कर्नाटकमधील रुग्ण उपचार घेत असतात. रोजची सुमारे पाचशे रुग्णांवर दोन्ही रुग्णालयांत उपचार केले जातात. यामुळे औषधे इतर जिल्ह्यांपेक्षा याठिकाणी अधिक प्रमाणात लागतात. वर्षाला सुमारे 30 कोटींची औषधे लागत असताना या प्रमाणात औषधे दिली जात नाहीत. पंधरवड्यापूर्वी शासकीय रुग्णालयाला सर्व आजारांवरील औषधे देण्यात आली आहेत.