विटा : पुढारी वृत्तसेवा
फूड इन्स्पेक्टर आहोत, असे सांगून विट्यातील एका हॉटेलात एका महिलेने आठवड्यात दोनवेळा फुकट जेवण केले. शिवाय अन्नात भेसळ होत असल्याचे सांगून मालकाकडून दहा हजार रुपये उकळले. ही घटना १२ ऑगस्ट रोजी सकाळी पावणे दहा वाजण्याच्या दरम्यान घडली. याबाबत विशाल चंद्रकांत चोथे (रा. यशवंतनगर, विटा) यांनी विटा पोलिसात संशयित स्वाती थोरात (वय ३६, रा. औदुंबर, ता. पलूस, जि. सांगली) यांच्या विरोधात फिर्याद दाखल केली आहे.
याबाबत फिर्यादीत म्हंटले आहे की, विटा ते कराड रस्त्यालगत विशाल चोथे यांचे हॉटेल आहे. १२ ऑगस्ट रोजी सकाळी पावणेदहा वाजण्याच्या सुमारास संशयित स्वाती थोरात हिने ती स्वत: फूड इन्स्पेक्टर (अन्न सुरक्षा अधिकारी) असल्याचे आय कार्ड दाखवून वारंवार येवून फुकट जेवण केले. हॉटेलमध्ये अन्न भेसळ होत आहे असे सांगून चोथे यांच्याकडून दहा हजार रुपये घेतले. विशेष म्हणजे ही रक्कम तिने फोन पे घेतली आणि फसवणुक केली आहे. याबाबत संशयित स्वाती थोरात यांच्या विरोधात विटा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला आहे.