सांगली ः पुढारी वृत्तसेवा
विटा शहरातील एका सहा वर्षांच्या बालकाचा दि. 8 रोजी मेंदुज्वराने (ताप) मृत्यू झाला. अचानक झालेल्या मृत्यूचे कारण तपासणीसाठी शुक्रवार, दि. 9 रोजी पुण्यातील लॅबला रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. मात्र दहा दिवस होऊनही रिपोर्ट आला नसल्याने यंत्रणेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
विट्यातील एका बालकाला ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात ताप आल्याने स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र त्याची प्रकृती गंभीर असल्याने सांगलीत एका खासगी रुग्णालयात भरती करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान गुरुवार दि. 8 रोजी सायंकाळी त्याचा मृत्यू झाला. प्राथमिक अंदाजानुसार मेंदुज्वराने त्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली. मात्र त्याचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, याची तपासणी करण्यासाठी रक्ताचे नमुने घेऊन पुण्यातील लॅबला पाठविण्यात आले आहेत. त्यामध्ये चंडीपुरा या विषाणूची लागण झाली आहे का, याचीही तपासणी होणार आहे. मात्र दहा दिवस झाले तरी तपासणीचा अहवाल अजून प्राप्त झाला नाही. त्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. पुण्यातील लॅबमध्ये राज्यातील विविध जिल्ह्यांतून विविध आजारांच्या तपासणीसाठी सॅम्पल येतात. सॅम्पलची संख्या मोठी असल्याने रिपोर्ट येण्यास
विलंब लागत असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. मात्र उपचार करण्यासाठी रोग आणि आजाराची माहिती होणे गरजेचे असते. त्यामुळे याचा गांभीर्याने विचार करून लॅबची संख्या वाढविण्याची गरज आहे.