

विटा : पुढारी वृत्तसेवा
टेंभू योजनेच्या खानापूर - तासगाव कालव्याच्या सर्व्हिस रोड (सेवा रस्ता) लाच जेसीबी लावून अर्धा एकरातला मुरूम बेकायदेशीर उचलला आहे. परिणामी टेंभू कालव्याची एक बाजू ढासळून भगदाड पडू शकेल अशी भीती निर्माण झाली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, टेंभू योजनेचा खानापूर - तासगाव कालवा वेजेगावातून पुढे जातो. या कालव्याला माहुली पासून पुढे १० ते १५ किलोमीटरवर वेजेगाव हद्दीत गट नंबर ६९९ वर सर्व्हिस रोड म्हणजे सेवा रस्त्याला एका शेतकऱ्याने जवळपास अर्ध्या एकर क्षेत्राला जेसीबी लावून तेथील मुरूम गायब केला आहे.
त्यामुळे या कालव्याची एक बाजू पावसाळ्यात ढासळून भगदाड पडू शकेल अशी स्थिती निर्माण झाली आहे. पूर्ण कालव्या वर जागोजाग मुरुमाचे ढीग होते. पण गौण खनिज माफियांनी ते यापूर्वीच गायब केले आहेत. आता माहुली पंपगृहाच्यापुढे खानापूर - तासगाव कालव्याच्या सेवा रस्त्यालाच जेसीबी लावला आहे. त्याकडे प्रशासनाकडून अर्थपूर्ण दुर्लक्ष होत असल्याची चर्चा आहे. याबाबत वेजेगाव येथील शिवतीर्थ पाणी वापर सोसायटीचे अध्यक्ष मनोज देवकर यांनी याबाबत टेंभूचे संबंधित अधिकारी अजित घाणेकर यांच्याकडे रितसर तक्रार दिली आहे.