तासगाव : पुढारी वृत्तसेवा
शनिवारी रात्रीनंतर रविवारी सकाळपर्यंत तासगाव तालुक्याला मुसळधार पावसाने झोडपून काढले. सावळज आणि वायफळे मंडलात अतिवृष्टी झाली. मांजर्डे मंडलातही 63 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. तालुक्यात 24 तासात तब्बल 52.6 मिलिमीटर पाऊस पडलेला आहे. या पावसामुळे ओढे - नाले भरून वाहते झाले असून अग्रणी नदीला पूर आला आहे. अनेक गावांच्या हद्दीतील अग्रणी नदीपात्रातील पुलावरून पाणी वाहू लागले होते. या भागातील द्राक्षबागा पावसाच्या पाण्याने तुडुंब भरलेल्या आहेत. मुसळधार पावसामुळे मध्यरात्रीनंतर अग्रणी नदीला पूर आला. पहाटेच्यावेळी सावळज, गव्हाण आणि मळणगाव हद्दीतील अग्रणी पात्रातील पूल पाण्याखाली गेले होते.
शनिवारी रात्रीपासून ते रविवारी पहाटेपर्यंत तालुक्यातील तासगाव, सावळज, मणेराजुरी, येळावी, विसापूर, मांजर्डे आणि वायफळे मंडलातील सर्व गावांना मुसळधार पावसाने झोडपून काढले होते. पावसामुळे तालुक्यातील अनेक गावांमध्ये रस्त्यालगतची झाडे उन्मळून पडली आहेत. विजेच्या तारा तुटल्याने विद्युत पुरवठा खंडित झाला होता.