

सांगली ः येथील कृष्णा नदीपात्रात पोहायला गेलेल्या जलतरणपटूवर मगरीने हल्ला केला. मगरीने त्यांचा पाय जबड्यात पकडला होता, पण प्रसंगावधान राखत त्यांनी दुसर्या पायाने मगरीच्या तोंडावर जोरदार प्रहार करून आपली सुटका करवून घेतली. ही घटना सोमवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास घडली. शरद दत्तात्रय जाधव (वय 56, रा. एकता कॉलनी, मार्केट यार्ड, सांगली) असे जखमी जलतरणपटूचे नाव आहे. मगरीने हल्ला केल्याचे वृत्त समजताच घबराट पसरली.
उन्हाची तीव्रता वाढल्याने कृष्णा नदीपात्रात पोहण्यासाठी मोठी गर्दी होत आहे. जाधव हे कृष्णामाई जलतरण संस्थेचे सदस्य आहेत. नदीपात्रात ते नेहमी मित्रांसमवेत पोहण्यासाठी जातात. सोमवार दि. 14 रोजी पहाटे 5.30 च्या सुमारास ते पोहण्यासाठी गेले होते. मित्र काठावर पोहत असताना ते नदीपात्राच्या सांगलीवाडीकडील बाजूला गेले. यावेळी अचानक त्यांच्यावर मगरीने हल्ला केला. त्यांचा पाय मगरीने जबड्यात पकडला. जाधव यांनी प्रसंगावधान राखत दुसर्या पायाने मगरीच्या तोंडावर जोरदार प्रहार केला आणि मगरीच्या तोंडातून पाय सोडवून घेतला. त्यानंतर मगर गायब झाली. जाधव तसेच काठावर आले. त्यांच्या मित्रांनी त्यांना तातडीने सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. त्यांच्या पायाला मगरीचे दोन दात लागल्याने जखम झाली आहे. वैद्यकीय अधिकार्यांनी त्यांच्यावर उपचार करून दुपारी घरी सोडले. याबाबत सांगली शहर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.