

विवेक दाभोळे
सांगली : यंदा सोयाबीनच्या दरात बड्या व्यापार्यांनी मनमानी करून दर पाडले. हमीभाव प्रतिक्विंटल 5 हजार 328 रुपये असताना किमान आधारभूत किमतीपेक्षा देखील कमी दराने खरेदी सुरू झाली आहे. मात्र याची सरकार नावाची यंत्रणा अजिबात दखल घेत नाही. तर यातून केवळ दरातच उत्पादकाला प्रतिक्विंटल हजार ते तेराशे रुपयांचा थेट फटका बसला आहे. परिणामी सोयाबीन उत्पादकांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे.
सांगली जिल्ह्यात बागायती आणि जिरायती शेतकर्यांना देखील सोयाबीन पिकाचे मोठे आकर्षण आहे. कमी वेळेत आणि कमी खर्चात हमखास उत्पादन आणि सुरुवातीच्या काळात दर चांगला मिळत असल्याने शेतकरी मोठ्या प्रमाणात सोयाबीन पिकाकडे शेतकरी वळला. मात्र आता दरातील चढ-उतार नव्हे, तर उतारच अनुभवावा लागला.
यंदा खरीप हंगामाच्या मागे देखील पावसाचे नष्टचर्य चांगलेच लागले आहे. मेपासून सुरू झालेला पाऊस आजअखेर सुरूच आहे. शेतकर्याने कशीबशी पेरणी केली, पीक आणले. पण पावसाने त्यावर पाणी फिरवले. आता तर सोयाबीनची काढणी, मळणी देखील पावसातच त्याला करावी लागत आहे. एवढे शेतात मर - मर मरून देखील सोयाबीनचे पीक साधलेच नाही.
चार वर्षांपासून सोयाबीनच्या दरात सातत्याने घसरण होत आहे. भरमसाट उत्पादन होऊनही अपेक्षित दर मिळत नसल्याने सोयाबीन उत्पादक पुरता उद्ध्वस्त झाला आहे. गेल्यावर्षी केंद्र सरकारने सोयाबीन आयातीसाठी मोठ्या प्रमाणात सवलती दिल्या. यातून लाखो टन सोयाबीनची देशात आयात झाली. हे आयात केलेले परदेशातील सोयाबीन मोठ-मोठ्या प्रकल्पांना कमी दरात उपलब्ध होऊ लागल्याने स्थानिक सोयाबीनला मागणी कमी दाखवली, तर सोयाबीनचे दर पाडले. खरेदीचे दर पाडण्यात माहीर असलेल्या बड्या व्यापार्यांना तर आयतेच हे निमित्त सापडले आणि सोयाबीनच्या दरात घसरण सुरू झाली. आता तर बाजारात सोयाबीनची खरेदी 3800 ते 4300 रुपये प्रतिक्विंटल या दराने होत आहे. खरे तर हमीभाव हा 5 हजार 328 रुपये प्रति क्विंटल आहे. यापेक्षा कमी दराने खरेदी होत असल्यास ती रोखून सरकारने हमीभावाप्रमाणे सोयाबीन खरेदी करणे कायद्याला अपेक्षित आहे. मात्र तसे होत नाही. व्यापारी शेतकर्यांना लुटत आहेत आणि शासन गेंड्याचे कातडे ओढून झोपेचे सोंग घेत आहे.
याआधी 2022-23 च्या हंगामात सोयाबीनचे दर पडले (की पाडले?) होते. 23-24 च्या हंगामात देखील त्याचीच पुनरावृत्ती झाली. गेल्या हंगामात जिल्ह्यात सोयाबीनचे क्षेत्र घटले होते. उत्पादन जेमतेमच झाले. बाजारात सोयाबीन कमी आले. दर चांगला मिळणे अपेक्षित असताना देखील शेतकर्यांचे वाटोळे केले. (पूर्वार्ध)
शेतकरी ज्या ट्रॅक्टरवाल्याकडून शेतीची नांगरट, खुरटणी करतो, सरी सोडून घेतो तो फायद्यात... ज्या कृषी सेवा केेंद्रातून बियाणे, खते, औषधे घेतो, त्या दुकानदारांच्या माड्यावर माड्या... ज्या शेतमजुरांकडून शेतातील कामे करून घेतो, पाणी पाजून घेतो, तो मजूर चैनीत... ज्या मळणी मशीन चालकाकडून सोयाबीनची मळणी करतो, तो मळणीयंत्र मालक फार्मात... आणि हे सारे जो करतो, तो शेतकरी मात्र कर्जबाजारी! स्वत: मरून इतरांना जो जगवितो, तो शेतकरी! अशी नवीनच व्याख्या यानिमित्ताने तयार झाली आहे.