

सांगली ः जिल्हा परिषदेमधील सर्व विभागांमध्ये बायोमेट्रिक हजेरी सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे सुमारे 350 कर्मचार्यांची आता हजेरी या प्रणालीनुसार होणार आहे. तसेच वेळेत न येणार्या कर्मचार्यांवर नियमानुसार कारवाई होणार आहे. मात्र या प्रणालीमुळे तरी कर्मचार्यांना शिस्त लागेल का, असा सवाल उपस्थित होत आहे.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांनी गेल्या महिन्यात पदभार स्वीकारल्यानंतर दुसर्याच दिवशी 10 वाजता प्रवेशद्वार बंद करून जि. प. मध्ये उशिरा येणार्या कर्मचार्यांना दणका दिला. सुरुवातीला समज देऊन एन्ट्री देण्यात आली. तेव्हापासून बुधवारपर्यंत दररोज सकाळी 9.45 वाजता प्रवेशद्वार बंद करण्यात येत होते. उशिरा येणार्या कर्मचार्यांची नोंद घेऊन 10.15 वाजता प्रवेशद्वार खोलण्यात येत होते. त्यामुळे अनेक कर्मचारी धावतपळत झेडपीत येत होते. उशिरा येणार्या कर्मचार्यांना नोटीस देण्यात आल्या. मात्र सीईओ नरवाडे यांनी कडक भूमिका घेतल्यानंतरही काही कर्मचारी उशिरा येत होते. त्यामुळे उशिरा येणार्या कर्मचार्यांना बायोमेट्रिक प्रणालीमुळे शिस्त लागेल का, असा सवाल उपस्थित होत आहे. प्रणालीपेक्षा कर्मचार्यांच्या मानसिकतेमध्ये बदल करण्याची गरज आहे आणि तशी मागणीही होत आहे.
सीईओ नरवाडे यांच्या सूचनेनुसार बायोमेट्रिक हजेरीसाठी जिल्हा परिषदेमध्ये चार मशीन बसविण्यात आले आहेत. सकाळी आणि सायंकाळी दोन वेळा इन- आऊट करणे बंधनकारक आहे. तसेच महिन्याच्या शेवटी याचा अहवाल घेऊन कार्यवाही करण्यात येणार आहे. सकाळी 9.45 ते सायंकाळी 6.15 अशी कर्मचार्यांची कार्यालयीन वेळ आहे. बायोमेट्रिक प्रणालीमुळे बहुसंख्य कर्मचारी वेळेत उपस्थित राहतील. मात्र हजेरी लावल्यानंतर ते खुर्चीवर दिसतील का, असाही सवाल उपस्थित होत आहे. कार्यालयीन वेळेत इतरत्र फिरणार्या कर्मचार्यांवही प्रशासनाने भूमिका घेण्याची मागणी लोकांतून होत आहे.