

सांगली : महानगरपालिकेने पाणीपट्टी थकबाकीदारांसाठी अभय योजना सुरू केली आहे. त्याचा लाभ घेत 14 हजार 365 थकबाकीदारांनी 7 कोटी 10 लाख 94 हजार 915 रुपये महापालिकेकडे भरले. दंड, व्याज माफीमुळे थकबाकीदारांचे 2 कोटी 10 लाख 81 हजार 234 रुपये वाचले आहेत. पाणी बिलातील दंड, व्याज यामध्ये 100 टक्के सवलतीची ही योजना दि. 31 ऑक्टोबरपर्यंत सुरू राहणार आहे.
थकित घरपट्टी वसुलीसाठी महापालिकेने अभय योजना राबविली. दरम्यान, थकित पाणीपट्टी वसुलीसाठी अभय योजनेस मंजुरी मिळावी, असा प्रस्ताव शासनाकडे पाठवला होता. आमदार सुधीर गाडगीळ यांनीही पाठपुरावा केला. शासनाने अभय योजनेला मंजुरी दिली. त्यानुसार चालू व थकित बिलाची रक्कम एकरकमी भरल्यास बिलातील दंड, व्याज यामध्ये 100 टक्के सवलत दिली जात आहे. त्याचा एकूण 14 हजार 365 नागरिकांनी लाभ घेतला आहे. थकित 7 कोटी 10 लाख 94 हजार 915 रुपये वसूल झाले आहेत. दंड, व्याज माफीमुळे थकबाकीदारांचे 2 कोटी 10 लाख 81 हजार 234 रुपये वाचले आहेत. दरम्यान, 39 हजार 500 नागरिकांची थकित पाणीपट्टी 45 कोटी रुपये होती.
सांगलीत मंगलधाम इमारत, विश्रागबाग येथे प्रभाग समिती क्रमांक 2 कार्यालय, मिरज पंचायत समिती समोरील पाणीपट्टी कार्यालय, मिरज येथील लक्ष्मी मार्केट महापालिका कार्यालय, कुपवाड येथील विभागीय कार्यालय शनिवार व रविवारीदेखील पाणी बिले भरून घेतली जाणार आहेत. नागरिकांनी अभय योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयुक्तसत्यम गांधी यांनी केले आहे. यावेळी उपायुक्तआकाश डोईफोडे उपस्थित होते.
क्युआर कोडद्वारे बिल भरण्याची सोय
एप्रिल 2025 ते जुलै 2025 अखेर पाणी बिले नागरिकांना वितरित केली आहेत. नागरिकांसाठी पाणी बिलावरील क्युआर कोडद्वारे ऑनलाईन बिल भरणा करण्याची सोय करण्यात आली आहे. बिलावरील क्युआर कोड मोबाईल स्कॅनर किंवा गुगल पे स्कॅनरवरून स्कॅन केल्यास महापालिका वेबसाईटवरील पेमेंट ऑपशनवर जाऊन नेट बँकिंग, डेबिट कार्ड/क्रेडिट कार्ड किंवा युपीआय पेमेंटद्वारे नागरिक बिल भरू शकणार आहेत.