

निंबळक : तुरची (ता. तासगाव) येथील गावाच्या जवळच असलेल्या स्मशानभूमीत केलेल्या लिंबू, नारळ आणि केळी भानामतीच्या प्रकाराने नागरिकांच्यात भीतीचे वातावरण पसरले आहे.
तुरची स्मशानभूमीत दि 1 नोव्हेंबरच्या रात्री अज्ञात व्यक्तीकडून भानामतीचा अघोरी प्रकार केल्याची घटना घडली आहे. यासाठी गावाजवळ असणार्या स्मशानभूमीच्या जागेत लिंबू, नारळ, केळी तसेच दोरा, कापूर, बाहुल्या, गुलाल, बुक्का, काळे पांढरे इत्यादी साहित्याचा वापर करण्यात आला असल्याने केलेली भानामती नक्की कोणत्या उद्देशाने केली आहे या चर्चाना उधाण आले असून गावातील नागरिक भीतीच्या छायेखाली वावरत आहेत. भानामतीचा झालेला प्रकार गावातील सरपंच विकास डावरे यांना समजताच त्यांनी प्रत्यक्ष भेट देऊन तेथील साफसफाई करत, गावातील नागरिकांनी अशा प्रकारावर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. तसेच मागील चार वर्षात सुहासिनी मृत स्त्रियांच्या अस्थी गायब होण्याचे गंभीर प्रकार घडले असल्याने, सदर व्यक्ती निदर्शनास आल्यास जादूटोणाविरोधी कायद्याअंतर्गत कार्यवाही करणार असल्याचे संगितले.