

जत : जत तालुक्यातील मुचंडी-कोट्टलगी रस्त्यावर ट्रॅक्टर रस्त्याकडेच्या खड्ड्यात उलटल्याने झालेल्या भीषण अपघातात दोघांचा मृत्यू झाला, तर एक गंभीर जखमी झाला. हा अपघात गुरुवार, दि. 9 रोजी सकाळी आठ वाजता घडला. अभिषेक विनोद आरेकर (वय 22) आणि सलमान सिकंदर मुक्केरी (वय 19, दोघे रा. चिकट्टी, ता. अथणी, जि. बेळगाव) अशी मृतांची नावे आहेत, तर मुत्तू अशोक गौडर (वय 20) हा गंभीर जखमी झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अभिषेक आणि सलमान आणि मुत्तू हे ट्रॅक्टरने मुचंडीस येत होते. कोट्टलगी रस्त्यावर नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर रस्त्याकडेला घसरून 15 ते 20 फूट खोल खड्ड्यात कोसळला. अपघातात अभिषेक आरेकर आणि सलमान मुक्केरी यांचा जागीच मृत्यू झाला, तर मुत्तू गौडर हा गंभीर जखमी झाला. त्याच्यावर जत ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेची माहिती मिळताच जत पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. अपघातात ट्रॅक्टरचा चक्काचूर झाला आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.