

कडेगाव शहर : खेराडे-वांगी (ता. कडेगाव) येथे शेतकऱ्यांच्या शेतातील कालव्यावर असलेल्या इलेक्ट्रिक मोटारींच्या चोरीचा छडा लावण्यात कडेगाव पोलिसांना यश आले. याप्रकरणी संशयित यश अजित माने (वय 18, रा. चितळी, ता. खटाव, जि. सातारा) याच्यासह टोळीला जेरबंद करण्यात आले. कारवाईत 17 विद्युत मोटारी व दोन दुचाकींसह 1 लाख 61 हजार 300 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
खेराडेवांगी हद्दीत गडकरी मळा ते म्हासुर्णेकडे जाणाऱ्या टेंभू कालव्यातील विद्युत मोटारींची चोरी झाल्याची फिर्याद शेतकरी सुरेश कृष्णा सूर्यवंशी (रा. खेराडे-वांगी) यांनी कडेगाव पोलिस ठाण्यात दिली होती. याबाबत सहायक निरीक्षक गणेश कोकाटे यांनी पथके रवाना केली. तपासादरम्यान, यश माने याचे नाव समोर अल्याने त्यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने इतर तीन अल्पवयीनांसोबत इलेक्ट्रिक मोटारी व केबल चोरीची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्याकडून गुन्ह्यातील 17 इलेक्ट्रिक मोटारी, केबल व गुन्ह्यात वापरलेल्या दोन दुचाकी, असा 1 लाख 61 हजार 300 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
संशयित यश माने याला अटक केली. कारवाईत पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक गणेश कोकाटे, सहायक उपनिरीक्षक उदयसिंह देशमुख, चंद्रकांत कारंडे, जोतिराम पवार, पुंडलिक कुंभार, अमोल जाधव, सागर निकम, लियाकत शेख, करण परदेशी, अजित पाटील सहभागी झाले होते.