

धन्वंतरी परदेशी
वाळवा : एका बाजूला उसाला टनाला 3751 रुपये मिळावेत म्हणून शेतकरी संघटनेचे आणि शेतकर्यांचे आंदोलन सुरू आहे, तर दुसर्या बाजूला एका शेतकर्याने एक टन उसाचे आठ ते दहा हजार रुपये मिळवले, तेही रोख आणि एका दिवसात. संजय माळी असे त्या शेतकर्याचे नाव. वाळवा तालुक्यातील नेर्ले गावचा हा शेतकरी आहे.
तुळशी विवाहाचा दिवस होता. घरोघरी तुळशीचे लग्न अतिशय थाटामाटात लावले जाते आणि त्यानंतर दिवाळी पूर्ण होते. त्यामुळे हार, फुले, आवळा, चिंच, बांगड्या, मोठ्या प्रमाणावर खरेदी केल्या जातात. याबरोबरच पाच ऊस आणि हिरवी ज्वारीची ताटेही लागतात. आता ज्वारीची ताटे मिळत नसल्यामुळे पाच ऊस विकत आणून लग्न लावले जाते, त्यामुळे उसाला चांगली मागणी असते, हे ध्यानात घेऊन नेर्ले येथील संजय माळी यांनी पहाटे ऊस तोडून, पाला सोलून ट्रॅक्टरच्या ट्रॉलीत भरून इस्लामपूर येथील सकाळची गणेश भाजी मंडई गाठली. सकाळी सहा वाजता ऊस विक्रीला सुरुवात केली. 100 रुपयांना पाच ऊस... लोकांनीही चांगलीच गर्दी केली आणि बघता-बघता सारी ट्रॉली मोकळी झाली. पुर्या मापाचा सुमारे सात फूट उंचीचा ऊस लोकांनी मोठ्या भक्तिभावाने खरेदी केला. सुमारे टनभर उसाचे 8 ते 10 हजार रुपये गोळा झाले आणि तेही केवळ दोन तासातच. याची काल शहरभर चर्चा सुरू होती. शेतकर्यांना पिकवता येते, मात्र विकता येत नाही, असा काहींचा सार्वत्रिक समज, याला अपवाद माळी हे ठरले. व्यापारी आणि दलाल यांना न विकता स्वतः त्यांनी विकून पैसा मिळवला. असे नानाविध पर्याय शेतकर्यांनी संघटितपणे निवडले तर सरकारकडे व कारखानदारांकडे हात पसरण्याची वेळ येणार नाही.
उसाचा रस काढून विकणारे एका उसाचे 60 ते 70 रुपये करतात. काकवी, गूळ विकणारे प्रचंड पैसे मिळवतात. शहरातील मॉलमध्ये उसाचे 6 ते 7 गरे 10 रुपयांना प्लास्टिक पिशवीतून विकले जातात. पण शेतकरी कारखान्यांना अक्षरशः 40 ते 50 पैसे दराने ऊस घालतात, मग यात साखर उत्पादन खर्च, तोडणी खर्च आणि काटामारी अशी राजरोस लुबाडणूक होऊन, त्याला तुकडे-तुकडे करून पैसे मिळतात. काही शेतकरी वैरणीला ऊस विकून चांगले पैसे मिळवतात. या गोड साखरेच्या कडू कहाणीत एखादा मेहनती आणि कल्पक माळींसारखा शेतकरी निश्चितच गोड दिशा देऊन जातो.