

सांगली : महानगरपालिका क्षेत्रातील पथदिवे प्रणालीचे आधुनिकीकरणाचे काम सुरू आहे. या तांत्रिक कामाची तपासणी आणि नोंदणी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी काही भागांतील पथदिवे काही दिवस दिवसा सुरू राहतील. त्यामुळे नागरिकांनी या तांत्रिक बाबीची नोंद घ्यावी आणि ही अत्यावश्यक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी महानगरपालिका प्रशासनास आवश्यक सहकार्य करावे, असे आवाहन कार्यकारी अभियंता (विद्युत) अमर चव्हाण यांनी केले आहे.
महापालिका क्षेत्रात स्मार्ट एलईडी प्रकल्प सुरू आहे. सांगली, मिरज आणि कुपवाड शहरात 43 हजार 800 स्मार्ट एलईडी दिवे बसवलेले आहेत. मात्र तीनही शहरातील हायमास्ट पोलवर अद्याप जुने पारंपारिक दिवे आहेत. याशिवाय काही पोलवरही जुने दिवे आहेत. अशा जुन्या दिव्यांची संख्या 1250 इतकी आहे. जुन्या दिव्यांचा वीज वापर जास्त आहे. त्याचा परिणाम ऊर्जा बचतीवर होत आहे. त्यामुळे हे जुने दिवे बंद करून वापर वीज युनिट व ऊर्जा बचतीची नेमकी माहिती घेणे तसेच पथदिवे प्रणाली आधुनिकीकरणाचे काम सुरू आहे. त्यामुळे जुने दिवे दि. 10 ऑक्टोबरपासून बंद ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे प्रमुख चौक, काही भाग अंधारात आहे. त्यामुळे नागरिक संताप व्यक्त करत आहेत. अशा परिस्थितीत शनिवारी महानगरपालिका क्षेत्रात महानगरपालिका क्षेत्रात दिवसभर एलईडी पथदिवे सुरू होते. त्यामुळे नागरिकांच्या संतापात भर पडली. त्यावर महानगरपालिकेला स्पष्टीकरण द्यावे लागले आहे.
कार्यकारी अभियंता (विद्युत) अमर चव्हाण म्हणाले, महानगरपालिका क्षेत्रात सध्या पथदिवे व्यवस्थापनाचे महत्त्वाचे तांत्रिक कामकाज सुरू आहे. सांगली समुद्र स्ट्रीट लायटिंग प्रा. लि. या कंपनीमार्फत शहरातील संपूर्ण पथदिवे प्रणालीचे आधुनिकीकरण करण्यात येत आहे. या कामांतर्गत पथदिवे सुरू व बंद करण्यासाठी असलेले सीसीएमएस पॅनल आणि सर्व स्मार्ट एलईडी दिवे कंपनीच्या पोर्टलवर ऑनलाईन नोंदविण्याचे कामकाज सुरू आहे. या तांत्रिक कामाची तपासणी आणि नोंदणी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी महापालिका कार्यक्षेत्रातील काही भागांतील स्ट्रीट लाईट काही दिवस दिवसा सुरू राहतील. त्यामुळे नागरिकांनी या तांत्रिक बाबीची नोंद घ्यावी आणि ही अत्यावश्यक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी महानगरपालिका प्रशासनास आवश्यक सहकार्य करावे.