पलूस : अधिकार्याच्या त्रासाला कंटाळून पलूस आगारातील वाहक दुशांत गंगाराम बुळे (वय 34, रा. मूळ गाव- फांगुळ गव्हाण पोस्ट-खंडकुंबे, ता. जुन्नर, जि. पुणे) यांनी गळफास घेऊन जीवन संपविल्याची घटना शनिवारी (दि. 12) रात्री घडली. याप्रकरणी पलूस आगाराचे तपासणी अधिकारी हणमंत रामचंद्र खरमाटे याच्याविरोधात पलूस पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. मृताचा भाऊ जालिंदर बुळे यांनी फिर्याद दिली.
दुशांत बुळे हे पलूस एसटी आगार येथे वाहक म्हणून सन 2012 पासून नोकरीला होते. दोन महिन्यांपूर्वी त्यांची पत्नी कॅन्सरने मृत झाली होती. पलूस आगारातील तपासणी अधिकारी खरमाटे हा वारंवार त्रास देत असल्याबाबतची माहिती बुळे हे आपल्या गावी गेल्यानंतर नातेवाईकांना सांगत होते.
12 ऑक्टोबर रोजी दुपारी दुशांत यांनी भाऊ दशरथ यांना फोन करून, पलूसला ये, आपण मोटरसायकलवरून सोमवारी गावी जाऊ असे सांगितले होते. त्यावेळी भाऊ दशरथ यांनी, काही झाले काय? असे विचारले असता दुशांत यांनी फोन कट केला होता. त्यानंतर सायंकाळी दुशांत यांनी, सांगली एस.टी. महामंडळातील तपासणी अधिकारी खरमाटे याने तासगाव बसस्थानक येथे त्रास दिल्याचा व्हिडीओ समाजमाध्यमावर ठेवला. त्यानंतर वहीमध्ये चिठ्ठी लिहून रात्री कोयना वसाहत येथील घरात साडीने गळफास घेऊन जीवन संपविले.