

सांगली : राज्य परिवहन महामंडळाच्या सांगली आगारास भाऊबीजदिवशी सवलतीसह 25 लाख 42 हजार 132 रुपये उत्पन्न मिळाले. गतवर्षाच्या तुलनेत यावेळी प्रवाशांची संख्ये सुमारे दोन हजारांनी वाढली, तर उत्पन्नातही गतवर्षाच्या तुलनेत दहा टक्के वाढ झाली.
भाऊबिजेच्या दिवशी म्हणजे 23 ऑक्टोबरला विनासवलत 16 लाख 1 हजार 428, तर सवलतीसह 25 लाख 42 हजार 132 रुपये उत्पन्न मिळाले. या दिवशी 43 हजार 181 किलोमीटरचा जादा प्रवास करण्यात आला. गेल्यावर्षी भाऊबिजेच्या दिवशी 1823 प्रवाशांनी, तर यावर्षी 3 हजार 621 प्रवाशांनी महामंडळाच्या बसेसमधून प्रवास केला. दिवाळीमध्ये प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी महामंडळाने 15 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबरदरम्यान दररोज 83 अतिरिक्त गाड्या सोडण्याचे नियोजन केले आहे. त्यात दिवाळी पाडवा आणि भाऊबीज असे सलग सुटीचे दिवस साधून नागरिकांनी प्रवासाचे नियोजन केले होते.