

इस्लामपूर : राजारामबापू कारखान्याच्या साखराळे, वाटेगाव-सुरूल व कारंदवाडी युनिटकडे गळीत हंगाम सन 2024-25 मध्ये गाळपास आलेल्या उसापोटी दिवाळी सणासाठी एकूण रुपये 8 कोटी 37 लाख ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर शुक्रवारी वर्ग केले असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष प्रतीक पाटील यांनी दिली.
माजी मंत्री आ. जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या साखर कारखान्याने गळीत हंगाम 2024-25 मध्ये 13 लाख 72 हजार 281 मेट्रिक टन उसाचे गाळप केलेले आहे. यामध्ये साखराळे युनिटमध्ये 6 लाख 73 हजार 432, वाटेगाव-सुरूल युनिटमध्ये 3 लाख 98 हजार 593, कारंदवाडी युनिटमध्ये 3 लाख 255 टन उसाचे गाळप केलेले आहे. साखराळे, वाटेगाव-सुरूल व कारंदवाडी युनिटकडे गाळपास आलेल्या उसास पहिला हप्ता प्रतिटन रुपये 3 हजार 200 प्रमाणे एकूण रक्कम रुपये 439 कोटी 12 लाख इतकी रक्कम ऊस बिलापोटी अदा केलेली आहे. सध्या दिवाळी सणासाठी 8 कोटी 37 लाख रुपये ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केलेले आहेत.
गळीत हंगाम सन 2025-26 करिता साखराळे युनिटमध्ये 9 लाख 50 हजार, वाटेगाव-सुरूल युनिटमध्ये 5 लाख 50 हजार व कारंदवाडी युनिटमध्ये 4 लाख 50 हजार, तिप्पेहळळी-जत युनिटमध्ये 3 लाख 50 हजार असे एकूण 23 लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट निश्चित केलेले आहे. याप्रसंगी उपाध्यक्ष विजयराव पाटील, संचालक देवराज पाटील, प्रदीपकुमार पाटील, कार्तिक पाटील, विठ्ठल पाटील, कार्यकारी संचालक आर. डी. माहुली, चिफ अकौंटंट संतोष खटावकर उपस्थित होते.