

दिलीप जाधव
मळणगाव : ऐन दिवाळीच्या तोंडावर सांगली पोलिस दलाच्या ‘संस्कृती सबसीडी कॅन्टीन’ ला 20 ऑगस्ट 2025 पासून टाळे ठोकण्यात आले आहे. सांगली पोलिसांसाठी कार्यरत असलेल्या सबसीडी कॅन्टीनमध्ये सुमारे 60 ते 70 लाख रुपयांचा मोठा अपहार उघडकीस आला असल्याची चर्चा पोलिस दलात दबक्या आवाजात सुरू आहे. संबंधित कर्मचार्याने प्राथमिक चौकशीत अपहार केल्याची कबुली दिली असल्याचे समजते, परंतु वरिष्ठांची परवानगी मिळाली नसल्याचे सांगत गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ सुरू असल्याचे आरोप पोलिस दलातूनच होऊ लागले आहेत.
पोलिसांच्या कुटुंबीयांसाठी सवलतीच्या दरात आवश्यक वस्तू पुरवणार्या या कॅन्टीनमधून दरवर्षी मोठ्या प्रमाणात खरेदी केली जाते. ऐन दिवाळीच्या सणासाठी पोलिस आणि त्यांच्या कुटुंबीयांनी खरेदीची तयारी केली असताना अचानक कॅन्टीन बंद करण्यात आल्याने अनेकांचे नियोजन कोलमडले आहे. जिल्ह्याच्या विविध तालुक्यातून येणार्या पोलिसांच्या कुटुंबीयांना कॅन्टीनचे टाळे बघून रिकाम्या हाताने परत जावे लागत आहे. यामुळे होणार्या आर्थिक भुर्दंडाच्या आणि मानसिक त्रासामुळे पोलिस कुटुंबीय हवालदिल झाले आहेत.
शहरातील विश्रामबाग चौक ते विवेकानंद चौक रस्त्यावर सांगली पोलिस मुख्यालयापासून काही मिनिटांच्या अंतरावर सांगली पोलिस दलाच्या पोलिस कल्याण विभागाद्वारे सुरू केलेले ‘संस्कृती सबसीडी कॅन्टीन’ आहे. 13 ऑक्टोबर 2023 रोजी अप्पर पोलिस महासंचालक रवींद्रकुमार सिंघल, विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी आणि तत्कालीन पोलिस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांच्या उपस्थितीत या कॅन्टीनचे उद्घाटन करण्यात आले होते. या कॅन्टीनमधून पोलिस कर्मचार्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना परवडणार्या दरात वस्तू मिळतात.
सदर कॅन्टीन चालविण्यासाठी पोलिस खात्यामधीलच एका कर्मचार्याची नेमणूक करण्यात आली होती. सुमारे दीड वर्ष कॅन्टीन अतिशय चांगल्या पध्दतीने सुरू होते. चार महिन्यापूर्वी या कॅन्टीनमध्ये अपहार झाला असल्याची कुणकुण पोलिस दलात सुरू झाली. मालाच्या विक्रीचे पैसे जमा करण्यात आले नसल्याच्या जोरदार चर्चाना उधाण आले.
या पार्श्वभूमीवर प्राथमिक चौकशीत 60 ते 70 लाख रुपयांचा अपहार झाल्याची बाब समोर आल्याची चर्चा सुरू होती. अशातच कॅन्टीन चालकाची कसून चौकशी केली असता, अपहाराची कबुली दिली असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. यानंतर सदर अपहाराची आणि दोषीची खातेनिहाय चौकशी सुरू झाल्याचे पोलिस दलातून ऐकायला मिळत आहे. दरम्यान, यानंतर या कॅन्टीनला 20 ऑगस्ट 2025 पासून सील ठोकण्यात आले आहे.
पोलिस कुटुंबीयांवर दिवसा चांदणे बघण्याची वेळ
सबसीडी कॅन्टीन हे पोलिस कल्याणाचा एक महत्त्वाचा भाग आहे. येथून अल्पदरात वस्तू मिळत असल्याने पोलिस कुटुंबीयांचा दैनंदिन खर्च सुसह्य होतो. मात्र, कॅन्टीन बंद झाल्याने आर्थिक भार वाढला आहे. आता पोलिस कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांकडून संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करून दोषींवर तत्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे. प्राथमिक चौकशीदरम्यान अपहार झाला असल्याचे उघडकीस येऊनही अद्याप संबंधित दोषींवर कोणताही ठोस गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. यासाठी वरिष्ठांची परवानगी मिळाली नसल्याचे कारण सांगितले जात आहे. यामुळे ऐन दिवाळीत पोलिस कुटुंबीयांवर दिवसा चांदणे बघण्याची वेळ आली आहे.