

पलूस ः अनपट वस्ती, भारतीनगर येथे अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करत रोकड व सोन्याचे दागिने असा एकूण 69 हजार 600 रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पलूस पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी विश्वनाथ तुकाराम बागवडे (वय 61, रा. अनपट वस्ती, भारतीनगर, पलूस) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, 21 ऑक्टोबररोजी रात्री 11.30 वाजता ते 22 ऑक्टोबररोजी पहाटे 6 वाजेच्या दरम्यान त्यांच्या घरात अज्ञात चोरट्याने प्रवेश करून चोरी केली. चोरट्याने किचनमधील दरवाजाला छिद्र पाडून आतील आडणा काढत घरात प्रवेश केला. रोकड व सोन्याचे दागिने चोरून नेले. चोरीस गेलेल्या मुद्देमालामध्ये 47 हजार रुपयांची सोन्याची चेन (9 ग्रॅम 414 मिली वजनाची), 4 हजार रुपयांच्या सोन्याच्या बाली (9 मिली वजनाच्या), 18 हजार 500 रुपये रोकड रक्कम तसेच घरगुती वापराचा जुना मिक्सर आणि स्टीलचे दोन डबे (किंमत 100 रुपये) असा एकूण 69 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल समाविष्ट आहे. पुढील तपास पलूस पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.