

तासगाव : तालुक्यातील पाचवा मैल (निमणी) येथे दोन दिवसांपूर्वी झालेल्या भांडणाच्या रागातून एकाचा कुर्हाडीने हल्ला करून खून करण्यात आला. चेतन ऊर्फ बुलट्या दुर्ग्या पवार (वय 45) असे मृताचे नाव आहे. ही घटना शनिवारी सकाळी साडेअकरा वाजता घडली. याबाबत मृत बुलट्या पवार यांचा भाचा गणेश सुनील काळे (वय 19, रा. पाचवा मैल, निमणी) याने तासगाव पोलिसात फिर्याद दिली आहे. चार दिवसात तालुक्यात खुनाची ही दुसरी घटना आहे. रोहित ऊर्फ बाळ्या पोपट मलमे व दत्तात्रय मच्छिंद्र गुजले (दोघेही रा. नागाव, निमणी) अशी संशयितांची नावे आहेत. त्यांना अटक केली असल्याचे पोलिस निरीक्षक संग्राम शेवाळे यांनी सांगितले.
याबाबत घटनास्थळ व पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी, संशयित रोहित व मृत बुलट्या यांच्यात शुक्रवारी काही कारणावरून वाद झाला होता. यावेळी बुलट्या याने संशयित रोहित याला शिवीगाळ केली होती. यामुळे रोहित संतापला होता. शनिवारी सकाळी साडेअकरा वाजता फिर्यादी गणेश काळे व त्याची वहिनी गीता काळे हे घरासमोर बसले असताना संशयित रोहित उर्फ बाळ्या व दत्तात्रय दुचाकीवरून तेथे आले. शुक्रवारी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून रोहित याने ‘तुला आता जिवंत ठेवत नाही’ असे म्हणून बुलट्यावर कुर्हाडीने डोक्यात व दंडावर हल्ला केला. डोक्यात कुर्हाडीचा वर्मी घाव बसल्याने बुलट्या जागेवरच रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. मोठा रक्तस्राव झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती तासगाव पोलिसांना मिळताच निरीक्षक संग्राम शेळके पथकासह घटनास्थळी दाखल झाले. उपअधीक्षक अशोक भवड, स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पथक व फॉरेन्सिक पथकास पाचारण करण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविला. जोरदार हल्ल्याने कुर्हाड बुलट्याच्या डोक्यात अडकून राहिली होती. डोक्यात खोलवर जखम झाली होती, असे उत्तरीय तपासणी करणारे डॉ. किल्लेदार यांनी सांगितले. पोलिसांनी तातडीने हालचाली करून संशयित रोहित मलमे व दत्तात्रय गुजले यांना अटक केली. अधिक तपास सहायक निरीक्षक काबुगडे करीत आहेत.
संशयित रोहित व मृत बुलट्या हे दोघे मित्र होते. दोन दिवसांपूर्वी दोघांमध्ये भांडण झाले होते. यावेळी झालेल्या शिवीगाळीचा राग मनात धरून हा खून केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. त्यांच्यात नेमक्या कोणत्या कारणावरून वाद झाला, हे अजून समोर आले नसले तरी खून नक्की कोणत्या कारणावरून झाला, याची चर्चा घटनास्थळी होती.