

इस्लामपूर : गाई चोरणार्या कर्नाटकातील चोरट्याला इस्लामपूर पोलिसांच्या पथकाने सापळा रचून येथील आरआयटी महाविद्यालय परिसरातून अटक केली. बुधवारी सकाळी पथकाने ही कारवाई केली. संजू सदाशिव हिरट्टी (वय 39, रा. कातराळ ता. कागवाड, जि. बेळगाव) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्याकडून दोन गाई पोलिसांनी ताब्यात घेतल्या आहेत.
बोरगाव (ता. वाळवा) येथील हर्षल हिंदुराव वाटेगावकर यांच्या जनावरांच्या गोठ्यातून 1 लाख रुपये किमतीच्या दोन गाई चोरीला गेल्या होत्या. हा प्रकार 15 दिवसांपूर्वी घडला होता. याप्रकरणी हर्षल यांनी 18 ऑक्टोबररोजी इस्लामपूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. बुधवारी सकाळी पोलिस निरीक्षक सोमनाथ वाघ, सहायक उपनरिक्षक उदयसिंग पाटील, हवालदार कुबेर खोत, गुन्हे प्रगटीकरण पथकातील दीपक घस्ते, विशाल पांगे, शशिकांत शिंदे हे इस्लामपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये गस्त घालत होते.
पथकाला गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की बोरगाव येथील जनावरांच्या गोठ्यातून गाई चोरी करणारा आरआयटी कॉलेज परिसरात येणार आहे. तेथे पोलिसांनी सापळा रचला. संशयितरीत्या फिरणार्या संजू हिरट्टी याला ताब्यात घेतले. त्याला पोलिस खाक्या दाखवताच त्याने बोरगाव येथून गाई चोरी केल्याची कबुली दिली. त्याच्यविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे.