

सांगली : मानधन, बदली, रोजंदारी 1,198 कर्मचार्यांना महापालिका सेवेत सामावून घेण्याचा प्रस्ताव मंत्रालयात मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. हे कर्मचारी गेली 30 ते 40 वर्षे अल्प वेतनावर काम करत आहेत. त्यांना सेवेत कायमस्वरूपी सामावून घेण्याबाबत गेली तीन-चार वर्षे जोराचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र महापालिका व नगरविकास विभाग यांच्यात या प्रस्तावाचा केवळ फुटबॉल सुरू आहे. बदली, रोजंदारी, मानधन कर्मचार्यांना सेवेत कायम करून न्याय देणे आवश्यक आहे.
महापालिकेची स्थापना दि. 9 फेब्रुवारी 1998 रोजी झाली. महापालिका अस्तित्वात येण्यापूर्वी तत्कालीन सांगली नगरपालिका, मिरज नगरपालिका, कुपवाड नगरपालिका कालावधीत 528 बदली कर्मचार्यांची नेमणूक करण्यात आली होती. त्यातील काही कर्मचारी मृत झाले, तर काहीजण वयोमानानुसार निवृत्त झाले. सध्या 276 बदली कर्मचारी कार्यरत आहेत. हे कर्मचारी तीस-चाळीस वर्षांपासून काम करत आहेत. त्यांना अतिशय तुटपुंजे वेतन मिळते. रोजंदारी कर्मचारी 45 होते. त्यापैकी 14 कर्मचारी कार्यरत आहेत. प्रशासकीय गरज व कामकाजाच्या आवश्यकतेनुसार पालिकेने वेळोवेळी 1016 कर्मचारी मानधन तत्त्वावर नियुक्त केले आहेत. यामध्ये लिपिक-टंकलेखक, कनिष्ठ अभियंता, बांधकाम पर्यवेक्षक, औषध निर्माण अधिकारी, रक्तपेढी सहायक, एक्स-रे तंत्रज्ञ, फायरमन, पंपचालक, व्हॉल्व्हमन, चौकीदार, बागमाळी, पशुवैद्यकीय अधिकारी आदी कर्मचारी काही पदांवर मानधन तत्त्वावर काम करत आहेत.
महापालिकेचा कर्मचारी आकृतिबंध दि. 14 फेब्रुवारी 2023 रोजी शासनाने मंजूर केला आहे. महापालिकेकडील विविध 152 संवर्गातील 3,454 पदांना मान्यता दिलेली आहे. वर्ग 3 मध्ये वाहनचालक संवर्गातील 88 पदे मंजूर आहेत. सध्या रिक्त पदे 57 असून मानधन तत्त्वावर कार्यरत वाहन चालक 206 आहेत. वर्ग 4 मध्ये सफाई कामगार संवर्गात 750 पदे मंजूर आहेत. सध्या 683 पदांवर कायमस्वरूपी कर्मचारी काम करत आहेत. रिक्त पदे 67 आहेत. त्यातील काही पदे लाड-पागे समितीअंतर्गत भरली जाणार आहेत. पण सध्या कार्यरत बदली कर्मचारी 367, मानधन तत्त्वावरील कर्मचारी 479 असे एकूण 846 सफाई कामगार कार्यरत आहेत. मंजूर पदांपेक्षा कार्यरत कर्मचारी जास्त आहेत.
1,198 अधिसंख्य पदांची निर्मिती करून या पदांवर कार्यरत बदली, रोजंदारी, मानधन कर्मचार्यांचे महापालिका सेवेत कायमस्वरूपी समावेशन करणे व त्यांना दरमहा वेतनासाठी सहायक अनुदान शासनाकडून उपलब्ध करून देण्याबाबत शासन स्तरावर धोरणात्मक निर्णय व्हावा, असा प्रस्ताव महापालिका प्रशासनाने 8 ऑगस्ट 2025 रोजी शासनाच्या नगरविकास विभागाला सादर केलेला आहे. हा प्रस्ताव मंत्रालयात धूळ खात पडून आहे.
बदली कर्मचारी : 276
रोजंदारी कर्मचारी : 14
मानधन कर्मचारी : 908
एकूण कर्मचारी : 1198