

जत : आमदार गोपीचंद पडळकर यांच्या माध्यमातून जत नगरपालिका इमारत, जत पंचायत समिती इमारत, उपप्रादेशिक कार्यालय नूतनीकरण विकास कामांना मंजूर झालेला निधी याबाबत भाजपच्यावतीने शहरात लावलेले डिजिटल पोस्टर अज्ञातांनी शनिवारी रात्री फाडले. या कृत्याच्या निषेधार्थ भाजपच्यावतीने संबंधितांवर कारवाई करावी, या मागणीसाठी विजयपूर - गुहागर महामार्गावर रास्ता रोको करण्यात आले. यामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. या आंदोलनात जत शहर मंडल अध्यक्ष आण्णा भिसे, सरदार पाटील, विक्रम ताड, परशुराम मोरे, अतुल मोरे, संतोष मोटे सहभागी झाले होते.
आमदार पडळकर समर्थक तसेच भाजप आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये विकास कामांवरून जुंपलेली आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. भाजपच्यावतीने शहरात लावलेले डिजिटल बॅनर्स फाडले होते. यावरून रविवारी सकाळी भाजप कार्यकर्ते व नेते आक्रमक झाले. महामार्ग काही काळासाठी रोखला होता. पोलिस निरीक्षक संदीप कोळेकर यांनी महाराणा प्रताप चौक येथे आंदोलनकर्त्यांची भेट घेतली. ते म्हणाले, ज्यांनी कोणी हे कृत्य केले आहे, त्याला शोधून अटक करू व त्याच्यावर कडक कारवाई करू. यानंतर सुमारे अर्धा तास सुरू असलेला हा रास्ता रोको मागे घेण्यात आला.
या प्रकाराबद्दल आमदार पडळकर म्हणाले, या लोकांना विकास ही संकल्पनाही समजलेली नाही व दुसर्याने विकास केलेला रुजतही नाही. यामुळे राग असू शकतो. आम्हाला काम करता आलं नाही, लोकांना कसे तोंड दाखवायचे, असा प्रश्न त्यांच्यासमोर आहे. तालुक्यात सुरू असलेला विकास विरोधकांना पचनी पडत नाही.