

सांगली : शहरातील वाढत्या वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी आयर्विन पुलाला समांतर बांधण्यात आलेल्या पुलाचा लोकार्पण सोहळा गुरुवार, दि. 6 नोव्हेंबररोजी सायंकाळी 5 वाजता होणार आहे. या पुलासाठी शासनाकडे पाठपुरावा करून 35.50 कोटी रुपये निधी मंजूर करून आणला होता, अशी माहिती आमदार सुधीर गाडगीळ यांनी दिली.
या पुलाचे लोकार्पण जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते होणार आहे. आ. गाडगीळ म्हणाले, “या पुलामुळे आयर्विन पूल परिसरातील वाहतुकीवरील ताण मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. शहरातील उत्तर-दक्षिण भागांतील संपर्क अधिक सुलभ होईल. सांगलीच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने हा पूल महत्त्वपूर्ण ठरणार आहे. लोकार्पण सोहळा सायंकाळी 5 वाजता, आयर्विन पूल परिसर, टिळक चौक, हरभट रोड, सांगली येथे पार पडणार आहे. या कार्यक्रमासाठी भाजप जिल्हा पदाधिकारी, प्रदेश व राष्ट्रीय पदाधिकारी, नगरसेवक, लोकप्रतिनिधी, मंडल अध्यक्ष, पदाधिकारी, शक्ती केंद्र प्रमुख, बूथ प्रमुख तसेच सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आ. गाडगीळ यांनी केले आहे.