

तासगाव : तालुक्यातील मणेराजुरी - गव्हाण रस्त्यावर सौर प्रकल्पाजवळ घोडागाडीने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात पती ठार, तर पत्नी गंभीर जखमी झाली. वसंत देवाप्पा पाटील (वय 82, रा. चिंचणी, ता. तासगाव) असे मृताचे नाव असून त्यांच्या पत्नी विमल वसंत पाटील या जखमी झाल्या आहेत. हा अपघात बुधवार, दि. 29 रोजी दुपारी घडला.
याबाबत अधिक माहिती अशी, वसंत पाटील हे पत्नी विमल यांच्यासह दुचाकीवरून (क्र. एमएच 10 बीपी 4704) गव्हाणमार्गे अंजनी येथे नातेवाईकांकडे निघाले होते. त्यांची दुचाकी मणेराजुरी-गव्हाण रस्त्यावरील सौर प्रकल्पाजवळ आली असता समोरून आलेल्या घोडागाडीने वसंत पाटील यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. वसंत पाटील यांच्या मानेला घोडागाडीचा जोरदार मार लागला. अपघातात ते गंभीर जखमी झाले. मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. दुचाकीवर पाठीमागे असलेल्या त्यांच्या पत्नी विमल या गंभीर जखमी झाल्या. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
घटनेची माहिती मिळताच तासगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी पंचनामा केला. तासगाव उपजिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाईकाच्या ताब्यात देण्यात आला. अपघातानंतर घोडागाडी चालक घोडागाडीसह घटना स्थळावरून पसार झाला. मृत वसंत पाटील यांचे पुतणे सचिन पाटील (रा. चिंचणी) यांच्या फिर्यादीवरून अज्ञात घोडागाडी चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपनिरीक्षक राजू अन्नछत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास सुरू आहे.