

भिलवडी : हजारवाडी (ता. पलूस) येथे टँकर व मोटारीची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना एचपी गॅस फॅक्टरीपासून तासगावकडे जाणार्या रस्त्यावर शुक्रवार, दि. 31 रोजी दुपारी दोन वाजता घडली. अॅड. ओंकार बंडोपंत हिंगमिरे (वय 27) व अधिक आनंदा शिंदे (28, दोघेही रा. राजापूर-बोरगाव, ता. तासगाव) अशी मृतांची नावे आहेत. अपघातात मोटारचालक आशुतोष विठ्ठल जाधव (27) हा गंभीर जखमी झाला आहे.
याबाबत माहिती अशी, दूध वाहतूक करणारा टँकर (एमएच 10, डीटी 3046) आणि मोटार (एमएच 10 इके 8005) यांची समोरासमोर धडक झाली. हा अपघात एवढा भीषण होता की, मोटारीचा चक्काचूर झाला. टँकरची धडक बसल्याने मोटारीतील अॅड. ओमकार हिंगमिरे व अधिक शिंदे यांचा जागीच मृत्यू झाला, तर चालक आशुतोष जाधव गंभीर जखमी झाला. अॅड. हिंगमिरे यांच्यासह तिघेही कामानिमित्त बोरगावहून भिलवडी स्टेशन येथे येत होते. यावेळी संतोष विलास शेंडे (45, रा. तासगाव) हे टँकर घेऊन भिलवडी स्टेशन येथून तासगावच्या दिशेने जात होते. मोटारीने विरूध्द बाजूने जाऊन त्यांच्या टँकरला जोरदार धडक दिली. वर्दळीच्या रस्त्यावर अपघात झाल्याने घटनास्थळी मोठी गर्दी झाली. स्थानिक नागरिकांनी तत्काळ जखमीला रुग्णवाहिकेतून खासगी रुग्णालयात दाखल केले. जखमी चालक आशुतोष जाधव याची प्रकृती चिंताजनक आहे.
घटनेची माहिती मिळताच भिलवडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली व पंचनामा केला. उपविभागीय पोलिस अधिकारी अशोक भवड यांनीही अपघातस्थळी भेट देऊन घटनेची माहिती घेतली. अधिक तपास भिलवडी पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक भगवान पालवे यांच्या मार्गदर्शनाखाली रोहिदास पावसे करीत आहेत. याप्रकरणी टँकरचालक संतोष शेंडे यांनी भिलवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
निंबळक ः भिलवडी येथील अपघातग्रस्त मोटारीतील तिघेही बालमित्र होते. अॅड. ओंकार हिंगमिरे हे एकुलते एक होते. त्यांच्या वडिलांचे बोरगाव येथे किराणा मालाचे दुकान आहे. अधिक शिंदे हा शिक्षण पूर्ण झाल्यानंतर स्पर्धा परीक्षांची तयारी करीत होता. त्याचे आई-वडील शेती करतात. दोघा मित्रांच्या अपघाती मृत्यूने राजापूर-बोरगाव परिसरात शोककळा पसरली होती.