

सांगली : केंद्रीय जीएसटी गुप्तचर संचालनालय, पुणेच्या पथकाने सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यात कर्नाटक सीमेलगत 40 लाखांचा गुटखा पकडला. जीएसटी चुकवून, विना ई-वे बिल गुटख्याची वाहतूक सुरू असल्याचे निदर्शनास आले. पथकाने गुटख्याचा टेंपो जप्त करून मिरजेत केंद्रीय जीएसटी कार्यालय येथे आणला आहे.
केंद्रीय जीएसटी गुप्तचर संचालनालय (डीजीजीआय), पुणे यांच्या पथकाला गुटखा विक्रीच्या अनुषंगाने माहिती मिळाली होती. त्यानुसार त्यांनी कर्नाटक सीमेलगत जत तालुक्याच्या हद्दीत एक टेम्पो पकडला. या टेम्पोमध्ये कर्नाटकमध्ये उत्पादित केलेला गुटखा होता. त्याची वाहतूक होत होती. मात्र टेम्पोचालकाकडे मालाच्या वाहतुकीचे ई-वे बिल नव्हते. जीएसटी चुकवून तसेच ई-वे बिल न बाळगता गुटख्याची वाहतूक सुरू असल्याचे निदर्शनास आल्याने हा टेम्पो मिरजेतील केंद्रीय जीएसटीच्या कार्यालयात आणण्यात आला.जप्त केलेला गुटखा 40 लाखांचा आहे. त्यावरील कराची रक्कम 12 लाख रुपये व दंड 24 लाख रुपये होतो, असे सूत्रांनी सांगितले.दरम्यान, केंद्रीय जीएसटी विभागाने जप्त केलेल्या गुटख्याची माहिती सांगलीतील अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकार्यांना दिली. त्यांनी हा गुटखा अन्न व औषध प्रशासनाच्या ताब्यात देण्याची मागणी केली आहे. त्यानंतर संबंधितावर फौजदारी गुन्हा दाखल होईल, असे सांगण्यात आले.