

कवठेमहांकाळ : कोंगनोळी (ता. कवठेमहांकाळ) येथील द्राक्ष उत्पादक शेतकरी नंदकुमार ढवळे व विकास ढवळे यांच्या बागेतील द्राक्षांच्या चार किलोच्या पेटीस 761 रुपयांचा विक्रमी दर मिळाला आहे. प्रयोगशील व प्रगतशील शेतीचा आदर्श उभा करणारे ढवळे बंधू यांनी आपल्या द्राक्षबागेत आधुनिक पद्धतींचा वापर केला.
त्यांनी 1 फेब्रुवारी रोजी खरड छाटणी केली, तर 17 जुलै रोजी फळ छाटणी घेतली. या दोन्ही छाटण्यांदरम्यान सुमारे साडेपाच महिन्यांचा कालावधी ठेवून बागेची उत्कृष्ट निगा राखण्यात आली. शेणखत व रासायनिक खतांचा समतोल वापर, तसेच सबकनपासून दोन डोळ्यावर छाटणी घेण्याचा निर्णय फायद्याचा ठरला. यामुळे द्राक्षबागेत मालाची चांगली भर पडली आणि बाजारात उच्च दर मिळवणे शक्य झाले, असे नंदकुमार ढवळे यांनी सांगितले.
छाटणी कालावधीत पाऊस भरपूर असतो. त्यामुळे बागेवर प्लास्टिक कागदाचे अच्छादन केले आहे. एकूण 40 गुंठे क्षेत्र असून त्यातील 20 गुंठे क्षेत्रातील सुपर सोनाका प्लॉटमधील द्राक्षाला 761 रुपये इतका उच्चांकी दर मिळाला. गेली दोन-तीन वर्षे अवकाळी पावसामुळे द्राक्षशेती अडचणीत आली होती. पण यंदा आगाप द्राक्ष फळ छाटणी घेऊन उच्चांकी दर मिळवत इतर द्राक्ष उत्पादक शेतकर्यांचा उत्साह वाढवला आहे. यंदाच्या सुपर सोनाका द्राक्षास चार किलोच्या पेटीस मिळालेला दर हा उच्चांकी असल्याचे द्राक्षतज्ज्ञांचे मत आहे.