सांगली : इंदिरानगर परिसरातील अंजली नितीन खांडेकर (वय 6 वर्षे, रा. पहिली गल्ली, सावंत प्लॉट) या चिमुरडीचा घरात खेळताना कापडी बेल्टने गळफास बसून मृत्यू झाला. पोलिसांनी कुटुंबीयांची कसून चौकशी केली. चिमुरडीचा मृत्यू संशयास्पद तर नाही ना, याची खातरजमा त्यांनी केली. अखेर वैद्यकीय तपासणीत गळफास बसून तिचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले.
सावंत प्लॉटमध्ये नितीन सावंत हे पत्नी व दोन मुलांसह राहतात. ते मार्केट यार्डात हमाली करतात. त्यांची मोठी मुलगी अंजली पहिलीच्या वर्गात शिकत होती. दुपारी शाळा सुटल्यानंतर ती घरी आली होती. तिचे वडील नितीन हे गावाकडे गेले होते. दुपारी चारच्या सुमारास अंजली टीव्हीवर कार्टून बघत होती, तर तिची आई दुसर्या खोलीत होती.
थोड्या वेळाने आई बाहेर आली, तेव्हा तिला अंजली खुंटीला कापडी बेल्टने गळफास घेतलेल्या स्थितीत आढळली. तिने आरडाओरड करून शेजारील लोकांना बोलावले. अंजलीला खुंटीवरून खाली उतरवत सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. परंतु, ती मृत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. चिमुकल्या अंजलीचा मृत्यू संशयास्पद असल्याची चर्चा परिसरात होती. विश्रामबाग पोलिसांना घटनास्थळी भेट दिली. स्थानिक गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक सतीश शिंदे, सहायक निरीक्षक चेतन माने, पंकज पवार, बिरोबा नेरळे यांनीही सिव्हिलमध्ये धाव घेतली. त्यांनी कुटुंबीयांची चौकशी केली. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. पण, वैद्यकीय तपासणीत बेल्टचा गळफास लागल्याने तिचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. विश्रामबाग पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली.