

सांगली : दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासन विभागाने जिल्ह्यातील मिठाई, खवा, फरसाण, चिवडा इत्यादी अन्नपदार्थ विक्री करणाऱ्या दुकानांची विशेष धडक तपासणी मोहीम हाती घेतली आहे. गेल्या दोन महिन्यात 160 दुकानांची तपासणी करून सुमारे पावणे चार लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे, अशी माहिती सहायक आयुक्त नि. सु. मसारे यांनी दिली आहे.
ते म्हणाले, सणाच्या काळात या पदार्थांची खरेदी-विक्री मोठ्या प्रमाणात होत असल्याने, काही ठिकाणी भेसळयुक्त किंवा निकृष्ट दर्जाचे पदार्थ विक्री होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सर्व आस्थापनांची सखोल तपासणी केली जात आहे. वापरले जाणारे तेल, तूप, दूध व अन्य पदार्थांचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले जात आहेत. दोन महिन्यात 160 तपासण्या करण्यात आल्या असून दूध 35, खवा मावा 11, तूप 28, खाद्यतेल 30, मिठाई 57, ड्रायफ्रूटस् 17, चॉकलेट 11, भगर 14 व इतर अन्नपदार्थांचे 36 नमुने असे एकूण 239 अन्न नमुने प्रयोगशाळेकडे विश्लेषणासाठी पाठविण्यात आले आहेत. 47 अन्न व्यावसायिकांना सुधारणा नोटीस पाठविण्यात आल्या असून 9 अन्न व्यावसायिकांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. 4 अन्न आस्थापनांच्या तपासण्या करून 984 लिटरचा व 3 लाख 83 हजार 581 रुपये किमतीचा खाद्यतेलाचा साठा जप्त करण्यात आला. विक्रेत्यांनी अन्नपदार्थ चांगल्या व आरोग्यदायी वातावरणामध्ये बनवावेत व विक्री करावेत. शिळे अन्नपदार्थ विक्री केले जाणार नाहीत याची दक्षता घ्यावी.