

सांगली ः पाच लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी शहरातील कुख्यात गुंड महेंद्र ऊर्फ बाळू वसंत भोकरे (वय 50, रा. गणेशनगर) याला अवघ्या चार तासात सांगली शहर पोलिस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने अटक केली. भोकरे याच्यावर यापूर्वीही अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. याप्रकरणी अजय लोखंडे यांनी शहर पोलिस ठाण्यामध्ये फिर्याद दिली होती.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, दि. 25 जुलै रोजी सायंकाळी सव्वाचार वाजता सांगलीतील रामभाऊ भिडे जलतरण केंद्राजवळ वॉकिंग ट्रॅकच्या कामावर सुपरवायझर लोखंडे यांच्याकडे भोकरे याने पाच लाख रुपयांची खंडणी मागितली. ‘काम बंद करा, अन्यथा जेसीबी व ट्रॅक्टर फोडून टाकीन, नाही तर जीव गमवाल’, अशी धमकी देत त्याने एडक्यासारखे हत्यार दाखवून दहशत निर्माण केली. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिस अधीक्षक संदीप घुगे, अप्पर पोलिस अधीक्षक कल्पना बारवकर व उपविभागीय अधिकारी विमला एम. यांनी तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिले. पोलिस निरीक्षक संजय मोरे यांच्या आदेशानुसार उपनिरीक्षक महादेव पोवार यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तयार करण्यात आले. मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे भोकरे हा गणेशनगर भागात असल्याचे समजल्यावर, पोलिसांनी त्याला पळून जाण्यापूर्वीच शिताफीने ताब्यात घेतले. याप्रकरणी पुढील तपास उपनिरीक्षक पोवार करीत आहेत.
भोकरे न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. भोकरे याच्यावर जीवे मारण्याचा प्रयत्न, आर्म अॅक्ट व इतर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.