

सांगली : येथील एका सेवानिवृत्त वृद्धाशी टेलिग्रामद्वारे संपर्क साधून ‘गोल्ड ट्रेडिंग’ करण्याचा बहाणा करून तसेच कमिशनचे आमिष दाखवत 25 लाख 35 हजार 346 रुपयांचा गंडा घातला. याबाबत प्रदीप गणपतराव चव्हाण (वय 63, रा. इरसेड भवनजवळ, जुनी धामणी रस्ता, सांगली) यांनी विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी याप्रकरणी संशयित निखिल शर्मा नामक व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, चव्हाण हे सेवानिवृत्त आहेत. कुटुंबीयांसह ते इरसेड भवनजवळील अपार्टमेंटमध्ये राहतात. मे 2024 मध्ये संशयित शर्मा नामक व्यक्तीने व्हॉटस्अॅप तसेच टेलिग्रामद्वारे चव्हाण यांच्याशी संपर्क साधला. शर्मा याने तो गोल्ड ट्रेडिंग करत असल्याचे चव्हाण यांना वेळोवेळी भासवले. एका अॅप्लिकेशनद्वारे गोल्ड ट्रेडिंग करून पैसे मिळवून देण्याचे आमिष दाखवले. त्याचे कमिशन, व्याज आणि कंपनीची मेंबरशिप म्हणून चव्हाण यांच्याकडून आरटीजीएस व एनईएफटीद्वारे 25 लाख 35 हजार 346 रुपये घेतले.पैसे घेऊन अनेक महिने उलटले, तरी गुंतवलेल्या पैशातून त्यांना ट्रेडिंगचा नफा अथवा त्याबाबत काहीही माहिती चव्हाण यांना मिळाली नाही. चौकशी केल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे चव्हाण यांच्या निदर्शनास आले. त्यांनी विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी संशयित शर्मा नामक व्यक्तीविरोधात बीएनएस 318 (4) व आयटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल केला आहे. विश्रामबाग पोलिसांनी शर्माचा शोध सुरू केला आहे.
फसवणूक झाल्यानंतर चव्हाण यांनी वर्षापूर्वी सायबर क्राईमकडे तक्रार दिली होती. त्यानंतर हे प्रकरण विश्रामबाग पोलिस ठाणे आर्थिक गुन्हे शाखा, वरिष्ठ अधिकारी यांच्या चर्चेत एक वर्ष निघून गेले. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे हे पैसे कधी वसूल होणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे.