

सांगली ः जिल्ह्यातील आटपाडी, जत, खानापूर, कडेगाव, तासगाव, कवठेमहांकाळ, पलूस, वाळवा, शिराळा, मिरज या 10 पंचायत समित्यांच्या सभापती पदांसाठी शुक्रवार, दि. 10 ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन समितीच्या सभागृहात दुपारी 1 वाजता आरक्षण सोडत होणार आहे.
पुढील अडीच वर्षांच्या कालावधीसाठी पंचायत समित्यांच्या सभापती पदांची आरक्षण सोडत होणार आहे. जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आणि नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन उपजिल्हाधिकारी (महसूल) राजीव शिंदे यांनी केले आहे. पंचायत समितीच्या सभापदी पदासाठी खुल्या प्रवर्गासाठी 6 जागा असून त्यामध्ये 3 जागा महिलांसाठी आरक्षित आहेत. त्यामुळे खुल्या आरक्षणाच्या सोडतीविषयी इच्छुकांना उत्सुकता लागून राहिली आहे. 10 पंचायत समित्यांचे कारभारी कोण होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
दहा पंचायत समित्यांचे सभापती प्रवर्गनिहाय आरक्षण पुढीलप्रमाणे ः
अनुसूचित जाती (महिला) - 1, नागरिकांचा मागास प्रवर्ग - 2, नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) - 1, सर्वसाधारण - 3, सर्वसाधारण (महिला) - 3, अशा एकूण 10 प्रवर्गामध्ये आरक्षण काढण्यात येणार आहे. राजकीय वर्तुळात जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीला महत्त्व आहे. दुसर्या फळीतील कार्यकर्त्यांना या निवडणुकीचे नेहमीच आकर्षण असते. त्यामुळे पंचायत समित्यांच्या सभापदी पदांविषयी ग्रामीण भागात तर्कवितर्क व्यक्त होत आहे.