

सांगली : दुचाकी घसरल्याने रस्त्यावर पडलेल्या महिलेच्या अंगावरून ट्रक गेल्यामुळे तिचा जागीच मृत्यू झाला. अंकली (ता. मिरज) येथे दि. 25 रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. शेवंता वसंत कज्जे (वय 65, रा. लक्ष्मीनगर, मिरज) असे मृत महिलेचे नाव आहे.
शेवंता कज्जे व वसंत कज्जे हे दांपत्य निमशिरगावहून मिरजेस दुचाकीवरून परतत होते. ते अंकली येथे आले असता त्यांची दुचाकी घसरली व दोघेही रस्त्यावर पडले. याचवेळी मागून वेगाने येणार्या ट्रकचे चाक शेवंता यांच्या खांद्यावरून गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला, तर वसंत गंभीर जखमी झाले. याप्रकरणी अशोक वसंत कज्जे यांनी ट्रक चालकाविरुद्ध फिर्याद दिली आहे. याबाबत सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात नोंद केली आहे.