

सांगली : महानगरपालिका क्षेत्रातील विविध विकास कामांचे सुमारे 684 कोटी रुपयांचे प्रस्ताव गेले काही महिने शासन दरबारी मंजुरीच्या प्रतिक्षेत आहेत. वारणा उद्भव पाणीपुरवठा योजना, शेरीनाला प्रकल्प, हनुमाननगर नाट्यगृह, महापालिका मुख्यालय इमारत तसेच विश्रामबाग आणि कुपवाड येथील भाजी मंडईच्या कामांच्या प्रस्तावांचा यामध्ये समावेश आहे. निवडणूक आचारसंहिता सुरु होण्यापुर्वी हे प्रस्ताव मंजूर होणार का? याकडे लक्ष लागले आहे.
वारणा उद्भव योजनेचा प्रस्ताव 454 कोटींचा आहे. समडोळी हद्दीतील कोळकी भागातील वारणा नदीपात्रातून पाणी उचलून सांगलीत माधवनगर रोडवरील माळबंगला जल शुध्दीकरण केंद्रात आणले जाणार आहे. तेथे या पाण्यावर प्रक्रिया करून ते सांगली व कुपवाड शहराला पुरवले जाणार आहे. यासाठी समडोळी येथे जॅकवेल उभारणे, माळबंगल्यापर्यंत सुमारे 9 किलोमीटर मुख्य जलवाहिनी टाकणे, जलवाहिनीसाठी कृष्णा नदीवर पूल बांधणे, माळबंगला येथे 81 एम.एल.डी. क्षमतेचे नवीन जलशुध्दिकरण केंद्र उभारणे, सांगली व कुपवाड शहरात नवीन 23 पाण्याच्या टाक्या बांधणे व या दोन्ही शहरात अंतर्गत 550 किलोमीटर लांब जलवाहिन्या टाकणे, आदी कामांचा समावेश आहे. या याजेनेसाठी महापालिकेला 136 कोटींचा स्वहिस्सा द्यावा लागणार आहे. वारणा उद्भव पाणी योजना झाल्यास सांगली व कुपवाड शहरातील मुख्य गावठाण व विस्तारीत भागातील पाणी प्रश्न बहुतांश मार्गी लागणार आहे. मात्र ही योजना अद्याप शासन दरबारी मंजुरीच्या प्रतिक्षेत आहे.
93 कोटी रुपयांची शेरीनाला योजनाही शासनदरबारी मंजुरीच्या प्रतिक्षेत अडकली आहे. या योजनेला मंजुरी देण्याबाबत अनेकदा आश्वासने दिली गेली, मात्र अद्याप मंजुरी मिळालेली नाही. कृष्णा नदीच्या प्रदूषणावरून उद्भवलेल्या समस्येवर विधानसभेत प्रश्न उपस्थित झाला होता. त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेरीनाल्यावर सांडपाणी प्रक्रिया योजनेची घोषणा केली होती. निधी कमी पडू देणार नाही, असे सांगितले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही अनेकदा निवेदने देण्यात आली. लवकर मंजुरी मिळेल, अशी आश्वासने मिळाली, मात्र अद्याप या योजनेचा प्रस्ताव मंजुरीच्या प्रतिक्षेत आहे.
हनुमाननगर येथे अद्ययावत नाट्यगृह प्रस्तावित आहे. त्यासाठी 30 कोटींचा निधीही मंजूर आहे. जागेच्या आरक्षणात नाट्यगृह उभारणी रखडली होती. नाट्यगृहाच्या उभारणीस केव्हा सुरुवात होणार, याकडे लक्ष लागले आहे. विश्रामबाग येथे भाजी मंडईसाठी 12 कोटींचा, तर कुपवाड येथे भाजी मंडईचा 6 कोटींचा प्रस्ताव शासनाकडे मंजुरीच्या प्रतिक्षेत आहे.
महानगरपालिका मुख्यालयाची नवीन इमारत विजयनगर येथे उभारण्यात येणार आहे. त्यासाठीचे अंदाजपत्रक, आराखडे तयार आहेत. या इमारतीच्या बांधकामाचे भूमिपूजन महापालिका निवडणूकीपूर्वी करू, अशी घोषणा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली होती. काही दिवसांपूर्वी महापालिकेचे अधिकारी सुधारित आराखडा घेऊन उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडे गेले होते. मात्र त्यासंदर्भातील बैठक लांबणीवर गेली. या इमारतीचे भूमिपूजन निवडणूक आचारसंहितेपूर्वी होणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
वारणा उद्भव पाणीपुरवठा योजना : 454 कोटी
शेरीनाल्यावरील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प राबविणे : 93 कोटी
महापालिका मुख्यालयासाठी नूतन इमारतीची उभारणी : 90 कोटी
हनुमाननगर येथे अद्ययावत नाट्यगृहाची उभारणी : 30 कोटी
विश्रामबाग परिसरामध्ये भाजी मंडईची उभारणी : 12 कोटी
कुपवाड परिसरामध्ये नवीन भाजी मंडईची उभारणी : 6 कोटी