सांगली : अनुकंपा तत्त्वावर गट ‘क’ व गट ‘ड’मध्ये प्रत्येकी 39 व महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून निवड झालेल्या 61, अशा जिल्ह्यातील 139 उमेदवारांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. शासकीय सेवेत असताना निधन झालेल्या अधिकारी, कर्मचार्यांच्या कुटुंबीयांना यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत लिपिक, टंकलेखक पदासाठी निवड झालेल्या, तसेच अनुकंपा तत्त्वावर निवड झालेल्या उमेदवारांना शनिवारी नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली. जिल्हा नियोजन समिती सभागृहात आयोजित या कार्यक्रमास आमदार डॉ. सुरेश खाडे, सुधीर गाडगीळ, सदाभाऊ खोत, जिल्हाधिकारी अशोक काकडे, पोलिस अधीक्षक संदीप घुगे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. स्नेहल कनिचे, उपजिल्हाधिकारी शिवाजी जगताप आदी उपस्थित होते. कार्यक्रमास पालकमंत्री चंद्रकांत पाटील ऑनलाईन उपस्थित होते.
ते म्हणाले, उमेदवारांनी प्रामाणिकपणे व जबाबदारीने लोकाभिमुख काम करून शासनाचा व जनतेचा विश्वास संपादन करावा. शासनाच्या 150 दिवसाच्या महत्त्वाकांक्षी कार्यक्रमातून या कार्यक्रमाला गती मिळाली. यासाठी जिल्हाधिकार्यांना अधिकार दिले आहेत. यापुढेही प्रतीक्षा सूची व रिक्त पदे यांचा वेळोवेळी आढावा घेऊ व अनुकंपा प्रवर्गातील उमेदवारांना न्याय देऊन शासकीय संस्थांचे बळकटीकरण करू. ही प्रक्रिया गतीने करण्यात येईल.
जिल्हाधिकारी अशोक काकडे म्हणाले, राज्य शासनाच्या सेवेत दाखल झालेल्या उमेदवारांनी आपण शासन व जनता यातील दुवा म्हणून काम करणार आहोत, याची जाणीव कायम ठेवावी. पोलिस अधीक्षक संदीप घुगे म्हणाले, नियुक्त उमेदवारांनी प्रामाणिकपणे व चिकाटीने काम करावे. दिलेली जबाबदारी नीट पार पाडावी. तहसीलदार अमोल कुंभार व सहकार्यांनी संयोजन केले. यावेळी विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, उमेदवार व त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते.
राज्यभरात दहा हजारहून अधिक नियुक्तीपत्रे प्रदान
राज्यभरात शनिवारी 5 हजारहून अधिक उमेदवारांना अनुकंपा तत्त्वावर, तर महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी) मार्फत शिफारस करण्यात आलेल्या 5 हजारहून अधिक उमेदवारांना नियुक्तीपत्रे दिली गेली. या माध्यमातून एकाच दिवशी 10 हजारहून अधिक उमेदवार शासकीय सेवेत दाखल होत आहेत.