

रत्नागिरी: कार्तिक वारीनिमित्त रत्नागिरी विभागातील तब्बल 162 हून अधिक एसटी बसेस पंढरपूरला गेल्या आहेत. त्यामुळे जिल्हातंर्गत प्रवास करणार्यांची मोठी अडचण झाली आहे. अपुर्या एसटी बसेसमुळे गाड्या वेळेवर येत नसल्यामुळे प्रवाशांना एक ते दीडतास गाड्यांची वाट पहावी लागत आहे. त्यामुळे नोकरदार, व्यापारी, दररोजचा प्रवास करणार्यांचे मोठे हाल होत आहेत.
गणेशोत्सव, दसरा, दिवाळीनंतर आता कार्तिकवारीनिमित्त रत्नागिरी विभागातून पंढरपूरसाठी जादा बसेस सोडण्यात आल्या आहेत. 162 हून अधिक एसटी बसेस पंढरपूरला गेल्या आहेत. त्यामुळे जिल्हांतर्गत एसटी बससेवा कोलमडली आहे.मागील तीन दिवसांपासून एसटी बसेस वेळेवर येत नाहीत. विशेषता सकाळी, सायंकाळी बसेस अपुर्या येत आहेत.रत्नागिरी, लांजा, राजापूर, चिपळूण, देवरूख, गुहागर, संगमेश्वर, कणकवली, सावंतवाडी याबसेस वेळेवर येत नाहीत. आल्यास मोठ्या प्रमाणात एसटीला गर्दी होत आहे. नाईलाजास्त प्रवाशांना उभे राहून प्रवास करावा लागत आहे. मोजक्याच गाड्या येत असल्यामुळे काहींना तासनतास एसटी बसची वाट पहात ताटकळत उभे रहावे लागत आहे आणि त्यातूनही एखादी बस आलीच तर ती प्रवाशांच्या तुडुंब गर्दीने खचाखच भरुन जात आहे. अशा बसमध्ये प्रवासी अक्षरश: मेंढरासारखे भरले जात आहेत.
दुसरीगाडी येत नसल्यामुळे उर्वरित प्रवासी वडाप, खासगी बसेसद्वारे कामाला जात आहेत. त्यामुळे ऐन सणासुदीत जिल्ह्याबाहेर एसटी बसेस जातात. मात्र जिल्हातंर्गत प्रवासाचे तीनतेरा वाजत आहेत. रत्नागिरी विभागाने जिल्हातर्गत सेवेचे नियोजन करणे गरजेचे असल्याचे प्रतिक्रिया प्रवाशांमधून उमटत आहेत.