

रत्नागिरी : दिवाळीचा सण आला की, रत्नागिरी जिल्ह्यात शहरांपासून गावांपर्यंत प्रत्येक ठिकाणी फटाक्यांचे तात्पुरते स्टॉल्स उभे राहतात. मात्र, यावर्षी अनेक ठिकाणी विनापरवाना आणि अनधिकृत फटाके स्टॉल्स उभारले गेले असून, प्रशासनाच्या निष्क्रियतेचा गैरफायदा घेत हा स्फोटक बाजार उघडपणे सुरू आहे. नियमांची पायमल्ली करत चाललेल्या या व्यवसायामुळे कायद्याचे उल्लंघन होत असून नागरिकांच्या जीवास धोका निर्माण झाला आहे.
गेल्यावर्षी राज्यात विविध ठिकाणी फटाक्यांनी स्फोट होऊन गंभीर घटना घडल्या होत्या. काहींना यामध्ये जीव सुद्धा गमवावा लागला होता. या घटनांवरून तरी प्रशासनाने बोध घेणे आवश्यक आहे. दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर शहरासह जिल्ह्याच्या ग्रामीण भागात सर्रास फटाक्यांचे स्टॉल्स दिसत आहेत. यातील अनेक स्टॉल्सना परवानगी घेतलेली नसते, हे बर्याचदा दिसून आले आहे. भीषण दुर्घटना टाळण्यासाठी प्रशासनाने वेळीच पावले उचलणे आवश्यक आहे.
फटाके विक्रीसाठी स्पष्ट नियमावली एक्प्लोझिव्हस रूल्स 2008 आणि एक्स्प्लोझिव्ह अॅक्ट 1884 अंतर्गत या कायद्यानुसार कोणालाही फटाक्यांचा साठा, वाहतूक किंवा विक्री करण्यासाठी महसूल विभाग व पोलिस प्रशसानाच्या परवानगीची आवश्यकता असते. फटाक्यांच्या स्टॉलसाठी पर्यावरणीय व अग्निसुरक्षा प्रमाणपत्र, फायर एक्स्टिंग विसर, सुरक्षित अंतर आणि अग्निरोधक साहित्याची व्यवस्था करणे बंधनकारक आहे. पण प्रत्यक्षात शहरात रस्त्याच्या कडेला, बस स्टॉपजवळ, शाळा आणि पेट्रोलपंपांच्या आसपास बिनधास्तपणे स्टॉल्स उभारले गेल्याचे दिसून येत आहे.
या अनधिकृत स्टॉल्समुळे आगीचा धोका, अपघात आणि स्फोटाची शक्यता वाढते. फटाके ज्वलनशील पदार्थ असल्याने थोडीशी निष्काळजी हाताळणीसुद्धा भीषण परिणाम घडवू शकते. बालकांद्वारे हाताळले जाणारे फटाक्यांमध्ये कमी दर्जाच्या रसायनांचा वापर झाल्याने धूर, आवाज आणि रासायनिक प्रदूषण वाढते. प्रशासनाने ही दिवाळी सुरक्षित करायची असेल तर प्रथम अनधिकृत स्फोटक व्यवसायांवर कारवाई करावी. संबंधित विभागांनी संयुक्त मोहिम राबवावी. नागरिकांनीही सावध राहणे आवश्यक आहे.