सांगली : शशिकांत शिंदे
सांगली - कोल्हापुरातील ऊसशेती, साखर कारखानदारी पाहून उद्योगपती रतन टाटा भारावून गेलेले... ऊसशेती पाहून मी खूप आनंदी झालो... असे त्यांचे शब्द होते... सांगलीतील उद्योजिका प्रभाताई कुलकर्णी बोलत होत्या. मी स्वित्झर्लंड वगैरे पाहिले, पण या परिसरातील ऊसशेतीनेही प्रभावित झाल्याचे रतन टाटा यांचे मनोगत होते.
उद्योजिका प्रभाताई कुलकर्णी यांच्या कारखान्याच्या उद्घाटनासाठी उद्योगपती रतन टाटा 1994 मध्ये सांगलीत आले होते. ते विमानाने कोल्हापुरात पोहोचले आणि तेथून मोटारीने सांगलीत आले. ज्येष्ठ नेते शरद पवार, पतंगराव कदम आदींच्या उपस्थितीत हा सोहळा झालेला. याच्या आठवणींना प्रभाताईंनी उजाळा दिला. त्यांच्या निवासस्थानी रतन टाटा यांनी भोजनाचा आस्वाद घेतलेला. शाकाहारी, मांसाहारी बेत होता, परंतु त्यांना महाराष्ट्रीयन भोजन आवडत असे, असे प्रभाताईंनी सांगितले.
सरळ, साधे व्यक्तिमत्त्व. मी मोठा आहे, हा भावच त्यांच्याठायी नव्हता. मिळून-मिसळून ते गप्पा मारत. आमची कारखानदार म्हणून ओळख निर्माण झालेली, तसेच शरद पवार यांच्या प्रयत्नामुळे ते सांगलीत आले... प्रभाताई आठवणीत रमल्या होत्या. आमच्या नवीन प्रकल्पाचे उद्घाटन त्यांनी केलेले. आमच्या कारखानदारीला टेल्कोने खूप सपोर्ट केला, ट्रकचे कास्टिंग आम्ही त्यांना पुरवत होतो, अशी माहिती त्यांनी दिली. उद्योगात बदल केले पाहिजेत, नवीन तंत्रज्ञान स्वीकारले पाहिजे, असा त्यांचा आग्रह असे. सामान्यांविषयी विलक्षण कळवळा प्रभाताई कुलकर्णी म्हणाल्या, सामान्यांविषयीचा रतन टाटा यांचा कळवळा भारावून टाकणारा होता. पावसाळ्यात रिक्षातून जाणारे भिजलेले प्रवासी पाहून, सामान्यांना परवडेल अशी मोटार तयार करावी, असे त्यांना वाटले.
प्रभाताई कुलकर्णी म्हणाल्या, सांगलीतील कार्यक्रमात रतन टाटा यांनी नॅनो मोटारीची संकल्पना बोलून दाखवली होती. एक लाख रुपयांत मोटार देण्याचे योजिले होते. त्यांच्या भाषणानंतर ज्येष्ठ नेते शरद पवार म्हणाले होतेे... पहिली मोटार मला द्या...
जमशेदपूर येथे कारखान्याबाहेर पडलेले मेटलचे तुकडे एका समाजातील लोक गोळा करीत असत. त्यावर त्यांचा उदरनिर्वाह चाले. या लोकांना त्यांच्या कारखान्यातील काहींनी हुसकावून लावले. रतन टाटा यांना ही घटना समजली. त्यांनी संबंधितांना बोलावून घेतले व त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. त्यांनी या लोकांनाच ते सर्व काम दिले आणि सामावून घेतले. रतन टाटा यांचा कळवळा हा असा होता. प्रभाताईंनी सांगितलेली ही एक आठवण.