सांगली/इस्लामपूर : पुढारी वृत्तसेवा
सांगली, मिरजेसह वाळवा तालुक्याला सोमवारी सायंकाळी पावसाने झोडपले. सांगलीत सायंकाळी पाऊस झाला. वाळवा तालुक्यात झालेल्या जोरदार पावसाने सखल भागातील शेतात पाणी साचले आहे. त्यामुळे खरीप पिकांना फटका बसणार आहे. सोमवारी दिवसभर कडक उन्ह लागत होते. वातावरणात उष्णता होती. सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास विजेच्या कडकडाटासह पावसाने सुरुवात केली. पावसाने शहरातील ताकारी रस्ता, कापूसखेड रस्ता, अंबिका उद्यान, तहसील चौक आदी परिसरातील गटारीचे पाणी रस्त्यावर आले होते. काही ठिकाणी रस्त्यावर गुडघाभर पाणी साचले होते.
तालुक्यातील येडेनिपाणी, कामेरी, नेर्ले, कासेगाव, वाटेगाव, बोरगाव, नवेखेड, आष्टा, वाळवा आदी परिसरांत जोरदार पाऊस झाला. गेल्या आठवड्यापासून सायंकाळी, रात्रीच्या सुमारास जोरदार पाऊस पडत असल्याने ओढे, ओघळी, नाले तुडुंब भरून वाहू लागले आहेत. गेली महिनाभर पिकांत पाणी आहे. सखल भागातील नवीन आडसाली लावणी, खरीप पिके कुजू लागली आहेत. उसाचा पाला काढणे, पिकांना रासायनिक खतांची मात्रा देणे, खरीप पिकांची भांगलण आदी कामे खोळंबली आहेत.