सांगली : पुढारी वृत्तसेवा
सांगलीत अत्याधुनिक ट्रक टर्मिनल विकसित करण्याचा प्रस्ताव लवकरच जिल्हाधिकारी यांच्यामार्फत शासनाला सादर केला जाईल, अशी माहिती महापालिकेचे आयुक्त शुभम गुप्ता यांनी दिली. जिल्हा ट्रक ट्रान्स्पोर्ट असोसिएशनच्या पाठपुराव्याला यश येत असल्याचे स्पष्ट होत आहे. जिल्हा ट्रक ट्रान्स्पोर्ट असोसिएशनच्या शिष्टमंडळाने बुधवारी महापालिकेचे आयुक्त शुभम गुप्ता यांची भेट घेतली. उपायुक्त वैभव साबळे, जनसुराज्यचे युवा प्रदेशाध्यक्ष समित कदम, सांगली जिल्हा ट्रान्स्पोर्ट असोसिएशनचे माजी अध्यक्ष व ऑल इंडिया मोटर ट्रान्स्पोर्ट काँग्रेसचे संचालक बाळासाहेब कलशेट्टी, विशेष निमंत्रित जयंत सावंत, अध्यक्ष सुरेंद्र बोळाज, उपाध्यक्ष महेश पाटील उपस्थित होते.
वखार भाग परिसरातील ट्रक टर्मिनल आधुनिक पद्धतीने विकसित करण्यासाठी सांगली जिल्हा ट्रान्स्पोर्ट असोसिएशन गेली पंचवीस वर्षे पाठपुरावा करत आहे. ट्रक टर्मिनलचा आराखडा संघटनेने 2011 साली शासनाकडे सादर केलेला होता. त्यास अनुसरून ट्रक टर्मिनल विकसित करण्यासाठी आयुक्त शुभम गुप्ता यांची भेट घेण्यात आली. सकारात्मक चर्चा झाली.
7 जुलै 2023 च्या शासन निर्णयाप्रमाणे ट्रक टर्मिनल विकसित करण्याबाबत शासनाला प्रस्ताव पाठवण्याचे निर्देश मंत्री शंभूराज देसाई यांनी जिल्हाधिकारी यांना दिले होते. दरम्यान, दहा दिवसांत सुधारित ट्रक टर्मिनल विकास प्रकल्प तयार होईल. हा प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्यामार्फत शासनाला सादर होईल, असे आयुक्त गुप्ता यांनी सांगितले. वाहतूकदारांची गैरसोय दूर करण्यासाठी सध्याच्या ट्रक टर्मिनल येथे तत्काळ विद्युत व्यवस्था, स्वच्छतागृह उभारण्याचेही त्यांनी मान्य केले. यावेळी ट्रान्स्पोर्ट असोसिएशनचे भाग्येश शहा, प्रीतेश कोठारी, नागेश म्हारगुडे, रोहित सावळे, शंकर यादव उपस्थित होते.