

मिरज : शहरातील स्टँड चौक आणि स्टेशन रस्त्यावर दहशत माजवणार्या सराईत तीन गुन्हेगारांची महात्मा गांधी चौक पोलिसांनी चांगलीच जिरवली. तिघा गुन्हेगारांनी स्टेशन रस्त्यावर दहशत माजविण्याचा प्रयत्न केला. यानंतर तातडीने सहायक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांच्यासह पथकाने स्टेशन रस्त्याकडे धाव घेतली. त्यांनी गुन्हेगारांना चांगला चोप दिला. त्यानंतर त्यांची गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी वरात काढण्यात आली. यावेळी ‘कायदे मे रहेंगे... तो फायदे में रहेंगे...’ अशा घोषणा संबंधित गुन्हेगारांनी हात जोडून दिल्या.
मिरज शहरातील स्टेशन रस्ता हा नेहमीच चर्चेत राहिला आहे. या ठिकाणी येणार्या प्रवाशांची सातत्याने लूटमार होत असते. नशेखोर गुन्हेगारांकडून हत्याराच्या धाकाने ही लूट केली जाते; परंतु याबाबत पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल होत नसल्याने संबंधित गुन्हेगारांवर कारवाई होत नव्हती. रविवारी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास तीन नशेखोर गुन्हेगारांनी रेल्वे प्रवाशांची पाकीट मारी केली. त्यानंतर बस स्टँड चौकात हातगाडी चालकांना दमदाटी केली. यावेळी त्यांनी विरोध केल्यानंतर त्यांना दगडाने मारहाण करण्याचा प्रयत्न केला. याची माहिती काही नागरिकांनी कंट्रोल रूमला कळवली. त्यानंतर महात्मा गांधी चौक पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक संदीप शिंदे फौज फाट्यासह स्टेशन रस्त्यावर दाखल झाले. यावेळी सराईत गुन्हेगारांकडून हा प्रकार सुरू असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर पोलिसांनी तिघांना चांगलाच चोप दिला. पोलिसांचा मार मिळतात तिघांनी ‘कायदे मे रहेंगे... तो फायदे मे रहेंगे...’ अशा हात जोडून घोषणा दिल्या. यानंतर सराईत गुन्हेगारांची दहशत मोडीत काढण्यासाठी पोलिसांनी मिरज रेल्वे स्टेशन रस्ता, बसस्थानक परिसर या परिसरातून त्यांची वरात काढली. तिघांनाही ताब्यात घेतले असून त्यांच्यावर रात्री उशिरापर्यंत कारवाई करण्याचे काम सुरू होते.
नाशिकमध्ये दहशत माजवणार्या गुन्हेगारांची पोलिसांनी वरात काढली होती. हाच पॅटर्न आता मिरजेत ही राबवला जात असल्याचे दिसून आले. गुन्हेगारावर केवळ कारवाई न करता त्यांची दहशत मोडीत काढण्यासाठी वरात काढल्याने पोलिसांचे कौतुक होत आहे.