सांगली : विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्यासाठी आता शेवटचे दोन दिवस राहिले आहेत. जिल्ह्यातील बहुतेक मतदारसंघातील लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे. सर्वच मतदारसंघात इच्छुकांनी जोरदार तयारी सुरू केली असून चुरशीच्या लढती होणार आहेत. अर्ज भरण्यासाठी उमेदवारांनी जोरदार तयारी केली असून शक्तिप्रदर्शनाने अर्ज दाखल करण्यात येणार आहेत.
पलूस-कडेगाव मतदार संघात माजी मंत्री डॉ. विश्वजित कदम यांच्या विरोधात भाजपची उमेदवारी संग्रामसिंह देशमुख यांना जाहीर झाली आहे. डॉ. कदम यांनी आमदार अरुण लाड यांची भेट घेतली आहे. डॉ. कदम हे सोमवारी शक्तिप्रदर्शनाने अर्ज दाखल करणार आहेत. या ठिकाणी दुरंगी की तिरंगी निवडणूक होणार, याची उत्सुकता आहे. शिराळा मतदार संघात आमदार मानसिंगराव नाईक यांच्या विरोधात भाजपचे सत्यजित देशमुख यांना उमेदवारी मिळाली आहे. देशमुख आज-सोमवारी शक्तिप्रदर्शनाने अर्ज दाखल करणार आहेत. वाळवा मतदार संघातील 48 गावांचा समावेश शिराळा मतदार संघात होतो. या मतदारसंघात महाडीक गटाचीही ताकद आहे. त्यामुळे या लढतीकडेही लक्ष असणार आहे.
वाळवा मतदारसंघात आमदार जयंत पाटील यांच्या विरोधात निशिकांत पाटील यांना उमेदवारी मिळाली आहे. ते उद्या-मंगळवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहणार आहेत. या मतदारसंघात एकास एक लढत करण्याचा विरोधकांचा प्रयत्न असणार आहे. त्यामुळे या ठिकाणी चुरशीने लढत होईल, असे मानले जात आहे.
सांगली मतदारसंघात आमदार सुधीर गाडगीळ यांच्या विरोधात काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील मैदानात आहेत. मागील विधानसभा निवडणुकीत या दोघांमध्ये चुरशीने निवडणूक झाली होती. यावेळी काँग्रेसकडून जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा जयश्री पाटील याही इच्छुक आहेत. त्यांनी प्रसंगी बंडखोरीचा इशारा दिला आहे. त्यांची भूमिका नेमकी काय असणार? याची उत्सुकता आहे. तासगाव-कवठेमंकाळ मतदारसंघात ‘आबा विरुद्ध काका’ अशी पारंपारिक लढत दोन्ही गटात होणार आहे. यावेळी रोहित पाटील यांच्या विरोधात माजी खासदार संजय पाटील आहेत. त्यांना माजी मंत्री अजितराव घोरपडे व राष्ट्रवादीचे घड्याळ चिन्ह मदतीला असणार आहे. त्यामुळे या ठिकाणची लढतही चुरशीची मानली जात आहे.
खानापूर-आटपाडी मतदारसंघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेची उमेदवारी सुहास बाबर यांना जाहीर केली आहे. त्यांना दिवंगत नेते अनिल बाबर यांची सहानुभूती मिळेल, असे मानले जात आहे. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून माजी आमदार सदाशिव पाटील किंवा वैभव पाटील असण्याची शक्यता आहे. त्यांना आटपाडीच्या देशमुख गटाची साथ असणार आहे. त्यामुळे या ठिकाणी एकास एक लढत होण्याची शक्यता आहे.
जत विधानसभा मतदारसंघात भाजपने आमदार गोपीचंद पडळकर यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्याविरोधात भाजपमधील सर्व इच्छुक एकवटले आहेत. आमदार विक्रमसिंह सावंत विरुद्ध आमदार गोपीचंद पडळकर या लढतीत या नाराज गटाची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आता शेवटचे दोनच दिवस राहिले आहेत. राजकीय पक्षातील दिग्गजांबरोबर अनेक ठिकाणी अपक्षही अर्ज भरण्याची शक्यता आहे.