

कुपवाड : सावळी (ता. मिरज) येथे आरटीओ ऑफिसच्या पिछाडीस मोकळ्या जागेत सराईत गुन्हेगाराचा अज्ञातांनी धारदार शस्त्राने वार करून खून केला. ही घटना सोमवारी रात्री उशिरा घडली. समीर रमजान नदाफ (वय 35, रा. कुपवाड) असे मृताचे नाव आहे. खुनानंतर हल्लेखोर पसार झाले आहेत. पोलिस संशयितांचा शोध घेत आहेत. नदाफ हा एका गुन्हेगारी टोळीशी संबंधित असल्याचे समजते.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी : कुपवाड औद्योगिक वसाहत ते सावळी रस्त्यालगत असलेल्या एका कारखान्यासमोर एक तरुण रक्ताच्या थारोळ्यात पडल्याची माहिती कुपवाड पोलिसांना मिळाली. सहायक पोलिस निरीक्षक दीपक भांडवलकर यांनी पोलिस कर्मचार्यांसह तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी जखमी नदाफला आयुष हेल्पलाईन टीमच्या मदतीने मिरजेतील शासकीय रुग्णालयात दाखल केले; परंतु त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. घटनेची माहिती मिळताच पोलिस अधीक्षक संदीप घुगे, अप्पर पोलिस अधीक्षक रितू खोखर, मिरजेचे उपअधीक्षक प्रणिल गिल्डा यांनी घटनास्थळी भेट दिली.